धाराशिव (प्रतिनिधी)- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, धाराशिव शाखा मागील 14 वर्षांपासून जिल्ह्यात सक्रियपणे कार्यरत असून नाट्य चळवळीला बळकटी देण्याचे काम सातत्याने करत आहे. जिल्ह्यात नाट्य चळवळ व्यापक प्रमाणात वाढली असून सर्व नागरिक व कलावंतांनी नाट्य परिषदेचे सभासद व्हावे,असे आवाहन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नियामक मंडळ मुंबईचे सदस्य तथा धाराशिव नाट्य परिषदेचे अध्यक्ष विशाल शिंगाडे यांनी केले.

शुक्रवार, 12 डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात शाखेचा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला डॉ. अभय शहापूरकर, राजेंद्र अत्रे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. नटराज यांच्या मूर्तीचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. पुढे बोलताना विशाल शिंगाडे म्हणाले की, देशाचे नेते पद्मविभूषण शरद पवार यांच्या वाढदिवसा निमित्त 12 डिसेंबर 2011 रोजी धाराशिव शाखेची स्थापना झाली. या काळात शहर आणि जिल्ह्यातील अनेक नाट्य विषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. धाराशिव मधील बंद पडलेली नाट्य परंपरा पुन्हा रुजवण्यासाठी परिषदेनं पुढाकार घेतला. नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली 1600 कलावंतांचा भव्य मेळावा घेण्यात आला. दरवर्षी एकांकिका स्पर्धा व मेळाव्यांचे आयोजन आजही सुरू आहे.

तुळजाभवानी आणि येडाईची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धाराशिव मध्ये लोक कलावंतांची मोठी खाण आहे. मागील 20 वर्षांपासून सम्राट नाट्य संस्था आणि धनंजय शिंगाडे बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या पुढाकारातून आराधी-पिंगळा, गरबा, जोगवा पिंगळी, वाघ्या-मुरळी, लोकगीत, भारूड, लोकनृत्य यांसारख्या सादरीकरणांची परंपरा जपली जात असल्याचे त्यांनी सांगितले. बालनाट्य शिबिरे, उस्मानाबाद एकांकिका महोत्सव, शंभराव्या नाट्य संमेलना निमित्त विभागीय संमेलन यांसारख्या विविध उपक्रमांचे आयोजन करून बाल-युवा पिढीला मंच उपलब्ध करून देण्यात आला असल्याचे शिंगाडे यांनी सांगितले.

 
Top