धाराशिव (प्रतिनिधी)- सेवा हाच खरा धर्म या ब्रीदवाक्याप्रमाणे रोटरी क्लब धाराशिव व रत्नानिधी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या जयपूर फूट (कृत्रिम हात-पाय) मोजमाप शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
दि. 9 व 10 डिसेंबर 2025 रोजी आयोजित या शिबिराचा एकूण 70 गरजू लाभार्थ्यांनी लाभ घेतला. या शिबिरासाठी धाराशिव जिल्ह्यासह उमरगा, लोहारा, कळंब, तुळजापूर, वाशी, बार्शी, उदगीर व लातूर येथून अपंग व गरजू लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या शिबिरामध्ये अपघात किंवा आजारामुळे हात किंवा पाय गमावलेल्या नागरिकांचे आधुनिक जयपूर फूट व हातांचे मोजमाप करण्यात आले. शिबिरात मोजमाप केलेल्या लाभार्थ्यांना एक महिन्याच्या आत कृत्रिम हात व पायांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती रोटरी क्लबचे अध्यक्ष रणजित रणदिवे यांनी दिली. या प्रसंगी रोटरी क्लबचे सचिव प्रदीप खामकर, तसेच रो. रविंद्र साळुंके, रो. पी. के. मुंडे, रो. मेघश्याम पाटील, रो. सुनील गर्जे व रो. इंद्रजीत आखाडे यांची उपस्थिती व सक्रिय सहभाग होता. या उपक्रमामुळे अनेक दिव्यांग बांधवांना नवजीवनाची आशा मिळाल्याने उपस्थित लाभार्थ्यांनी रोटरी क्लब धाराशिव व रत्नानिधी चॅरिटेबल ट्रस्टच्या सेवाभावी कार्याचे मनापासून कौतुक केले.
