धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव येथील श्रीकृष्ण नागरी पतसंस्था येथे आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्रातील असंघटित कामगार चळवळीचे प्रणेते, हमाल पंचायतचे संस्थापक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळीचे सक्रिय आंदोलनकर्ते डॉ. बाबा आढाव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.
डॉ. बाबा आढाव यांनी हमाल, माथाडी व असंघटित क्षेत्रातील कामगारांना संघटित करून त्यांच्या हक्कांसाठी लढा दिला. कामगारांना न्याय, सन्मान व सुरक्षिततेसाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला असून सामाजिक न्याय, समता व संविधानाच्या मूल्यांची त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून मांडणी केली. यावेळी कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे राज्य अतिरिक्त महासचिव हरिभाऊ बनसोडे, संविधान संरक्षण समितीचे प्रा.डॉ. दिनकर झेंडे,प्रदीप शिंदे, बाळासाहेब माने, प्रभाकर बनसोडे, ॲड. अजित कांबळे तसेच रि.पा.इं. (खरात) पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राउत उपस्थित होते.
कार्यक्रमात विजय गायकवाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ नामांतर आंदोलनाच्या काळात ठाणे सेंट्रल कारागृहात डॉ. बाबा आढाव यांच्या सहवासातील आठवणींना उजाळा दिला. तसेच हरिभाऊ बनसोडे व प्रा. डॉ. दिनकर झेंडे यांनी आपल्या भाषणातून डॉ. बाबा आढाव यांच्या विचारांना उजाळा दिला. कार्यक्रमाच्या शेवटी प्रभाकर बनसोडे यांनी आभार मानले.
