तुळजापूर (प्रतिनिधी)- राज्यभर नगरपरिषद निवडणुकीचे मतदान सुरू असतानाही मंगळवार, दि. 2 डिसेंबर रोजी तीर्थक्षेत्र तुळजापूरात भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. थंडीचा जोर असतानाही सकाळपासूनच भाविक श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने दाखल होत होते.
सलग सुट्यांचा योग आल्यानंतर शनिवारपासूनच तुळजापूरात भाविकांची सततची राळ सुरू झाली होती. शनिवार, रविवार, मंगळवारच्या सुट्ट्या आणि त्यात सोमवारी घेतलेल्या रजेमुळे चार दिवसांचा ब्रेक मिळाल्याने शहरी भागातून मोठा ओघ दिसून आला. आज तर परिस्थिती वेगळीच होती. अनेक शहरी भाविकांनी मतदान केंद्रावर जाण्याऐवजी थेट तुळजाभवानी मंदिरात दर्शनाला येण्याला प्राधान्य दिले. त्यामुळे मतदानाच्या दिवशीही तुळजापूरात भाविकांची असामान्य गर्दी झाली.
