उमरगा (प्रतिनिधी)- शिवसेना हिंदुत्ववादी तर आहेच पण इथल्या बौद्ध, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन,या अल्पसंख्याक समाजाचा सन्मान करते सर्व धर्माच्या माणसांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आहे. कोणताही जातीभेद येथे केला जात नाही म्हणूनच येथील अध्यक्षपदासाठी मुस्लिम ओबीसी समाजातील निष्ठावंत शिवसैनिकाला संधी दिली आहे. आजपर्यंत जगातील सर्व क्रांत्या सामान्य माणसांनी केल्या आहेत.भ्रष्टाचारी प्रवृत्तीच्या लोकांना नगरपालिकेत स्थान देऊ नका असे आवाहन माजी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केले.
शहरातील पतंगे रोडवरील अण्णाभाऊ साठे चौकातील सचिन कॉर्नर येथे शनिवारी घेण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी अनंत पाताडे, आमदार प्रवीण स्वामीं, बाबा पाटील, रजाक अत्तार, शीतल चव्हाण, बसवराज वरनाळे, पोपट सोनकांबळे, अमोल बिराजदार आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना दानवे म्हणाले की, महाराष्ट्र, कर्नाटक सीमावर्ती भागातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी झाल्याने सरकारने 31 हजार कोटी रुपयांचें पॅकेज जाहीर केले पण ते आजपर्यंत शेतकऱ्यांना मिळाले नाही. आस्मानी व सुलतानी संकटात शेतकरी भरडला जात आहे. शेतकऱ्यांच्या सोयाबीन, उडीद, तूर, ऊस या पिकांना भाव मिळत नाही. केवळ आश्वासने देऊन लोकांची दिशाभूल करणारे हे सरकार आहे. असे ते म्हणाले. यावेळी आमदार प्रवीण स्वामीं, सुधाकर पाटील,शीतल चव्हाण रजाक अत्तार आदींची भाषणे झाली.
