मुंबई (प्रतिनिधी)- ज्येष्ठ समाजवादी नेते, दैनिक मराठवाडाचे माजी संपादक पन्नालाल सुराणा यांच्या निधनाने भूमिहीन शेतकरी, मजूर, वंचितांच्या हक्कांसाठी लढणारे व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, जुना समाजवादी पक्ष,जनता पक्ष, अनेक पुरोगामी संघटना आणि जन आंदोलन यांच्या उभारणीमध्ये पन्नालाल सुराणा यांचा मोठा वाटा होता. 'चले जाव' आंदोलनापासून ते स्वातंत्र्य चळवळीपर्यंत, त्यानंतर स्वातंत्र्य ते आणीबाणी आणि त्यानंतर देशाच्या सामाजिक,राजकीय स्थित्यंतराचे ते साक्षीदार होते. मराठवाड्यात भूकंपात सर्वस्व गमावलेल्यांसाठी त्यांनी सुरू केलेल्या 'आपलं घर' मधून अनेक मुला- मुलींची आयुष्य घडली आहेत.
पन्नालाल सुराणा यांच्या निधनाने समाजवादी चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे. पर्यावरण आणि जलसंधारणाच्या क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे.सामाजिक न्यायासाठी त्यांचा लढा कायम स्मरणात राहील. त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पन्नालाल सुराणा यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.