नळदुर्ग (प्रतिनिधी)-  राष्ट्रसेवादलाचे माजी अध्यक्ष,जेष्ठ समाजवादी विचारवंत व नळदुर्ग येथील “आपलं घर“ प्रकल्पाचे जनक पन्नालाल सुराणा यांचे वयाच्या 93 व्या वर्षी दि.2 डिसेंबर रोजी रात्री 8.30 वा. नळदुर्ग येथील आपलं घर येथे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने नळदुर्ग शहर व परीसरासह सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.त्यांच्या पश्चात्य मुलगा प्रभास आणि कन्या आरती असा परीवार आहे.

साथी पन्नालाल सुराणा हे मुळचे सोलापुर जिल्ह्यातील बार्शी येथील रहिवासी आहेत. त्यांनी शालेय जीवनातच राष्ट्रसेवादलात दाखल होऊन सेवादलाचे काम सुरु केले होते. पुढे त्यांनी जयप्रकाश नारायण यांच्या बिहारमधील सोखादेवरा येथील सर्वोदय आश्रमात राहुन भुदान चळवळीत भाग घेतला. समाज प्रबोधन संस्थेचे सचिव म्हणुन व समाजवादी पक्षाच्या राज्य शाखेचे सचिव म्हणुनही त्यांनी काम पाहिले आहे.

महाविद्यालयीन शिक्षण पुर्ण झाल्यानंतर त्यांनी पत्रकार म्हणुन काम केले आहे. ते मराठवाडा दैनिकाचे संपादक होते. पन्नालाल सुराणा यांनी मोठ्या प्रमाणात लिखाणही केले आहे. त्यांनी राजकीय, आर्थिक, वैज्ञानिक या विषयांवर 40 पेक्षा जास्त पुस्तके लिहिली आहेत. शेतकरी -शेतमजुर यांच्या हक्कासाठी त्यांनी अनेकदा आंदोलने केली आहेत. आणीबाणीच्या काळात त्यांना अटक झाली होती. भुमीमुक्ती चळवळीत त्यांना चारवेळेस तुरुंगावास झाला होता. 1993 साली लातुर जिल्ह्यात झालेल्या विनाषकारी भुकंपात निराधार झालेल्या मुलांसाठी त्यांनी नळदुर्ग येथे “आपलं घर“ हा प्रकल्प सुरु केला. पर्यावरण तसेच जलसंधारण क्षेत्रातही पन्नालाल सुराणा यांनी काम केले आहे.राजकारणात असतांना त्यांनी बार्शी येथील विधानसभा निवडणुक व सोलापुरची लोकसभा निवडणुकही त्यांनी लढविली होती. 

पन्नालाल सुराणा यांचे दि. 2 डिसेंबर 2025 रोजी रात्री 8:30 वाजता नळदुर्ग येथील आपलं घर येथे दुःखद निधन झाले आहे. त्यांनी देहादान केला असल्याने रात्री 11.30 वाजता त्यांचा मृतदेह सोलापुर येथील  छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात देहदानासाठी नेण्यात आला.दि. 3 डिसेंबर रोजी सर्व प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर त्यांचे देहादान करण्यात आले. पन्नालाल सुराणा यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असुन ज्ञानदीप कलोपासक व धरीत्री प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या वतीने त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.


 
Top