धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यात आठ नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवार दि. 2 डिसेंबर रोजी शांततेत मतदान पार पडले. जिल्ह्याची एकूण मतदानाची सरासरी 68.97 टक्के इतकी असली तरी जिल्ह्यात तुळजापूर शहरवासिय मतदान प्रक्रियेमध्ये अव्वल राहिले आहेत.
मंगळवारी सकाळपासूनच धाराशिव शहरात मतदान केंद्रावर मतदारांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. परंतु मतदान केंद्रामध्ये धिम्या गतीने मतदान सुरू होते. दोन मशीनवरील तिघांना मतदान देणे आवश्यक असल्यामुळे तिन्ही मतदान केल्यानंतरच मशीनचा आवाज ऐकू येत होता. त्यामुळे मतदारांना वरचे नाव त्याच मशीनवरील खालील उमेदवाराचे नाव व दुसऱ्या मशीनवरील तिसऱ्या उमेदवाराचे नाव पाहण्यासाठी वेळ लागत होता. त्यामुळे धाराशिव शहरात धिम्या गतीने मतदान चालू होते. परंतु जिल्ह्यात तुळजापूर, भूम, परंडा, नळदुर्ग, कळंब या ठिकाणी मतदान गतीने झाल्यामुळे मतदानांची टक्केवारी वाढली आहे. धाराशिव शहरातील खॉजानगर येथील जिल्हा होमगार्ड मतदान केंद्रावर रात्री साडेसात पर्यंत मतदान प्रक्रिया चालू होती.
मतदानाची सरासरी 68.97 टक्के
धाराशिव जिल्ह्याची मतदानांची सरासरी 68.97 टक्के आहे. जिल्ह्यातील आठ ही नगरपालिकेत एकूण 2 लाख 43 हजार 672 मतदारांपैकी 1 लाख 68 हजार 56 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये पुरूष 87 हजार 735 तर महिला 80 हजार 302 एवढ्या मतदारांचा समावेश होता. नगर परिषद निहाय मतदानाची अंतिम टक्केवारी पाहिल्यास तुळजापूर 80.28 टक्के, भूम 79.21 टक्के, परंडा 78.13 टक्के, नळदुर्ग 73.17 टक्के, कळंब 72.69 टक्के, मुरूम 67.41 टक्के, उमरगा 66.81 टक्के आणि धाराशिव 61.14 टक्के या प्रमाणे टक्केवारी आहे. जिल्ह्याचे ठिकाण असलेले धाराशिव शहरात जिल्ह्यात सगळ्यात कमी मतदान झाले आहे. हायकोर्टाच्या निर्णयाप्रमाणे या निवडणुकीची मतमोजणी 21 डिसेंबरला होत आहे.