धाराशिव (प्रतिनिधी)- रोटरी क्लब धाराशिव व विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने धाराशिवमध्ये दोन महत्त्वाची आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. नागरिकांनी या उपक्रमांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

रोटरी क्लब धाराशिव, विवेकानंद मेडिकल फाउंडेशन, रिसर्च सेंटर व विवेकानंद कॅन्सर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक शनिवार, 06 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 5.00 स्थळ फुलाई मल्टीस्टेट, डी.आय.सी.  रोड, सह्याद्री हॉस्पिटलसमोर, धाराशिव आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचा उद्देश ग्रामीण भागात वाढत असलेल्या गर्भाशयाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग तसेच पुरुषांमध्ये तंबाखू सेवनामुळे होणारा मुखाचा कर्करोग लवकर ओळखणे हा आहे. कर्करोगाचे निदान सुरुवातीच्या अवस्थेत झाल्यास उपचार पूर्ण यशस्वी होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

विशेषतः 30 वर्षांवरील महिलांनी तसेच तंबाखू सेवन करणाऱ्यांनी या शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन रंजीत रानदिवे (अध्यक्ष), प्रदीप खामकर (सचिव), रोटरी क्लब धाराशिव आणि प्रवीण काळे (सचिव, रोटरी सेवा ट्रस्ट) यांनी केले आहे.

तसेच रोटरी क्लब धाराशिव आणि रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत हात-पाय कृत्रिम अवयव मोजणी शिबिर आयोजित केले आहे. दिनांक: 09 व 10 डिसेंबर 2025, स्थळ: जे. एफ. अजमेरा रोटरी नेत्र रुग्णालय,  रोड, फिल्टर टाकी मागे, धाराशिव येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात अपघात, आजार किंवा इतर कारणांमुळे पाय गुडघ्याच्या खाली किंवा हात कोपऱ्याच्या खाली कापले गेलेले नागरिक पात्र ठरणार आहेत. या नागरिकांची मोजणी करण्यात येणार आहे.

रंजीत रानदिवे (अध्यक्ष -  रोटरी क्लब धाराशिव)  9404955959, मयूर काकडे (अध्यक्ष - प्रहार संघटना जिल्हाध्यक्ष धाराशिव)  9673554491, प्रदीप खामकर (सचिव -  रोटरी क्लब धाराशिव)  8888531285 यांच्याशी संपर्क साधावा. या दोन्ही उपक्रमांद्वारे नागरिकांना मोफत व महत्त्वपूर्ण आरोग्य सेवा मिळणार असून, जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन रोटरी क्लब धाराशिवतर्फे करण्यात आले आहे.

 
Top