धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव येथील महावितरण कार्यालयात बदली प्रकरणात तब्बल 30 हजार रुपयांची लाच स्वीकारताना महावितरणचे तीन कर्मचारी बुधवारी (दि.10) सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. या कारवाईमुळे विभागात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, महावितरणमधील एका कर्मचाऱ्याची बदली करण्यासाठी उदय दत्तात्रय बारकुल लिपीक उपकार्यकारी अभियंता कार्यालय धाराशिव, भारत व्यंकटराव मेथेवाड उप व्यवस्थापक मानव संसाधन, विभागीय महावितरण कार्यालय धाराशिव, शिवाजी सिद्राम दूधभाते उच्च स्तरीय लिपीक अधीक्षक अभियंता महावितरण मंडळ कार्यालय धाराशिव या तिघांनी एकत्रितरित्या 30 हजार रुपयांची मागणी केली होती.
त्याप्रमाणे तक्रारदाराने तिघांना बदलीसाठी एकदा 20 हजार रूपये व मित्राकडून घेवून 10 हजार रूपये दिले असल्याचे निष्पन्न झाले होते. तक्रारदाराने हा प्रकार थेट एसीबी विभागासमोर उघड केल्यानंतर एसीबीने तिघांचीही झडती घेवून मोबाईल जप्त केले आहेत. त्यांच्या घराची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. माधुरी केदार कांगणे पोलिस अधिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग संभाजीनगर, शशिकांत सिंगारे अपर पोलिस अधीक्षक, योगेश वेळापुरे पोलिस उपअधीक्षक धाराशिव यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी म्हणून पोलिस निरीक्षक विजय वगरे, पोलिस निरीक्षक नवरटे, पोहे जाधव, पोलिस अंमलदार तावस्कर, पोलिस अंमलदार डोके, हजारे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धाराशिव यांनी काम पाहिले. महावितरणच्या कार्यालयात एसीबीच्या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.
