धाराशिव (प्रतिनिधी)- 2006 ला मी नगराध्यक्ष झाल्यानंतर धाराशिव शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा नगर परिषदेच्या स्वनिधीतून उभा केला. शहराच्या वैभवात भर टाकणारे नाट्यगृह उभा केले. आमदार राणाजगजितसिंह पाटील त्यावेळी मंत्री मंडळात मंत्री होते. त्यामुळे मला मुंबईत बोलवून घेवून विकास कामे मार्गी लावली अशी माहिती माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सोमवार दि. 1 डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेस भाजपचे ॲड. नितीन भोसले, माजी नगराध्यक्ष सुनिल काकडे, युवराज नळे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना दत्ता बंडगर यांनी सांगितले की, त्यावेळेस आमदार राणा पाटील यांनी पंचसुत्री कार्यक्रम राबविण्यात आला होता. धाराशिव शहराला 24 तास पाणी देण्याचे नियोजन तयार करण्यात आले होते. परंतु त्यानंतर झालेले काही बदल त्यामुळे ती योजना पूर्ण होवू शकली नाही. 2016 ते 2022 आम्ही शिवसेने सोबत धाराशिव नगर परिषदेमध्ये सत्तेत होतो असे सांगितले जात आहे. भाजप व शिंदे शिवसेना चुकीचे काम झाल्यामुळेच जिल्हाधिकारी यांच्याकडे धाराशिव नगर परिषदेच्या कामाची चौकशी करण्याची मागणी केली आहे असे बंडगर यांनी सांगितले.
4 कोटीची एफडी
आमची सत्ता धाराशिव नगर परिषदेमध्ये असताना न. प.चा कारभार काटकसरीने करत 4 कोटी रूपयांची नगर परिषद धाराशिवची एफडी बँकेत केली होती. आज मात्र 128 कोटी रूपयांचे देने धाराशिव नगर परिषदेवर आहे. विरोधकांच्या काळात कागदपत्रे कामे करून बोगस बीले काढण्यात आली आहेत. निवडणुकीत आरोप-प्रत्यारोप होत असतात. परंतु भाजप नेते नितीन काळे यांच्याकडे 61 कोटी रूपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे पुरावे आहेत. असा दावा करत दत्ता बंडगर यांनी अंडरग्राऊंड ड्रेनेज योजना कोठेही यशस्वी झाली नाही. धाराशिव शहरात अंत्यत लहान पाईप अंडग्राऊंड ड्रेनेज योजनेसाठी वापरण्यात आले आहेत. केवळ भाषणावर निवडणुका जिंकता येत नाहीत. त्यासाठी जनतेसमोर विकासाचे मॉडेल ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे आमदार राणा पाटील यांच्या ताब्यात धाराशिव नगर परिषद द्यावी अशी मागणी बंडगर यांनी पत्रकार परिषदेत केली.
