उमरगा (प्रतिनिधी)- सध्या उमरगा नगर परिषदेची निवडणुकीत रंगत वाढली असून एक दुसऱ्यावर आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. यापुर्वी झालेल्या सभेत शिंदे गटाने युती न होण्यासाठी भाजपा कारणीभुत असल्याचे म्हंटले होते. त्यावर भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हर्षवर्धन चालूक्य यांनी जारी केलेल्या पत्राद्वारे सर्व आरोप खोडून काढले असुन निवडून आल्यानंतरचा अजेंडा जाहीर केला आहे. 

पत्रात म्हंटले आहे की, महायुतीबाबतचा शिवसेना (शिंदे गटाने) केलेला आरोप तथ्यहीन असून शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या अट्टाहासामुळे महायूती होऊ शकली नाही. यापूर्वी आमचे 1 नगराध्यक्ष व 15 नगरसेवक असल्यामुळे नगराध्यक्ष पदावरचा आमचा दावा ठाम होता. नगरपालिकेच्या प्रशासकीय काळात विरोधकांनी विकासाच्या नावाखाली केलेल्या भ्रष्टाचारामुळे आम्ही यूती केली नाही. विरोधकांनी पोसलेल्या गुंडागर्दी व दहशतीला आळा घालण्याची व शहरात कायदा सुव्यवस्था व शांतता राखण्याची जबाबदारी यापुढे आमची राहील. उमरगा शहर हे राष्ट्रीय महामार्गावरील राज्याच्या शेजवटच्या टोकाला असुन तालुक्याचे ठिकाण आहे. शहरात विविध कामानिमित्त हाजारों महिला, पुरुष येतात. येथे येणाऱ्या विशेषत: महिला व मुलींसाठी स्वच्छतागृह नाहीत. निवडणूकीनंतर प्राधान्याने याची उभारणी करण्यात येईल. नविन व्यापारी संकूल आणि भाजी मंडईसाठी प्रयत्न करणार. शहरातील विद्यार्थ्यांसाठी माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या नावाने आय टेक्नॉलॉजी सुविधा सहीत इनोव्हेशन हॉल तयार करणार. सोलापूरकडून उमरगा शहरात प्रवेशद्वारवर बायपास रोडवर छत्रपती संभाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा तसेच इंदिरा चौक- अहिल्या देवी होळकर, पतंगे रोड आण्णाभाऊ  साठे व अंतुबळी सभागृहासमोर महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा उभारणार. दर महिन्याला एका प्रभागात नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, नगरसेवक व कर्मचारी यांच्या उपस्थितीत जनसेवा कॅप भरविण्यात येईल. मुस्लीम समाजासाठी शहराच्या विस्तारानुसार दफनभूमी जागा उपलब्ध करुन देणार.

शहरातील महिला व नागरीकांच्या सुरक्षततेसाठी सीसीटीव्ही कॅमॅरे बसविण्यात येतील. हुतात्मा स्मारकाजवळील नवीन पुल बांधण्यात येईल. यामुळे शहरात प्रवेश करताना रहदारीस अडथळा होणार नाही. शहरातील प्रत्येक वार्डात सुचना व तक्रार पेटीची व्यवस्था करण्यात येईल. कर्नाटकातुन महाराष्ट्रात येताना शहराकडील पूर्वेस बायपास चौकात श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा उभारण्यात येईल. चोवीस तास उपलब्ध अत्याधूनिक वाचनालयाची उभारणी करण्यात येईल.आण्णाभाऊ साठे चौक ते महात्मा बसवेश्वर शाळेपर्यात ड्रेनेजसह मोठा रस्ता तयार करण्यात येईल.अनु.जाती व जमाती व अल्पसंख्यांक लोकांना पक्के घरे बांधून देणार असल्याचे हर्षवर्धन चालूक्य यांनी जारी केलेल्या पत्रात म्हंटले आहे.


 
Top