धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव नगर परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेला धोका देऊन पाठीत खंजीर खुपसला आहे. अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी दिली आहे.
धाराशिव नगर परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि धाराशिवचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्यात चर्चा होऊन जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला. त्यानंतर 17 जागा आणि काही सभापती पदे शिवसेनेला देण्याचे ठरले. परंतु 2016 च्या निवडणुकीत नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष ही दोन्ही पदे शिवसेनेकडे असताना ही पदे देण्यास शिवसैनिकांचा विरोध होता. तेव्हा युतीधर्म म्हणून शिवसैनिकांची समजूत काढून 17 जागा लढविण्याची तयारी केली. वास्तवात आमच्याकडे देखील नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी 41 उमेदवार असताना आम्ही 17 जागा लढविण्याचे मान्य केले. परंतु उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मात्र आम्हाला 2 जागा घ्या, 4 जागा घ्या असे सांगून ऐनवेळी 17 जागावर त्यांचे उमेदवार कायम ठेवून धोका दिला आहे. आता वरिष्ठ नेत्यांसमवेत चर्चा करून शिवसेनेची भूमिका स्पष्ट करणार असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी सांगितले.
