धाराशिव (प्रतिनिधी)- नळदुर्ग हद्दीत जळकोट येथे घडलेल्या वृध्द महिलेच्या खून प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसांत तपास केला असून, आरोपीस गजाआड करण्यात यश मिळवले आहे. यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे खून करणारी आरोपी महिला शेजारी राहणारी निघाली असून पोलिसांनी तिला पुण्यातून ताब्यात घेतले.
यासंबंधी सविस्तर वृत्त असे की, दिनांक 21 नोव्हेंबर 2025 रोजी सुभद्रा रामशेट्टी पाटील (वय 60, रा. जळकोट) या महिलेचा तिच्या राहत्या घरात अज्ञात व्यक्तीने खून करून अंगावरील सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पोस्टे नळदुर्ग येथे खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. प्रकरण अत्यंत गूढ असल्याने सुरुवातीला पोलिसांना कोणतेही ठोस पुरावे मिळत नव्हते. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तातडीने तपासाची जबाबदारी दिली. त्यानुसार पोनि विनोद इज्जपवार, सपोनि सुदर्शन कासार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळी जाऊन तपासाची दिशा निश्चित केली तसेच गोपनीय माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. तांत्रिक तपासाच्या आधारे घटनास्थळाजवळ संशयास्पदरीत्या फिरणारी एक महिला आढळून आली. चौकशीत तिची ओळख वनिता झुंबर सुरवसे (रा. जळकोट) अशी पटली. तिच्या मुलाकडून अधिक माहिती घेतली असता ती उपचाराकरिता पुणे येथे गेल्याचे समजले. त्यानंतर पथक पुणे येथे रवाना झाले. पुढील तपासात ती भिगवण येथे मुलीकडे असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान सुरुवातीला आरोपी महिलेनं उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, विश्वासात घेऊन विचारपूस केली असता अखेर तिने गुन्ह्याची कबुली दिली. चौकशीतून उघड झाले की, आरोपीने मयत सुभद्रा पाटील यांच्याकडून दागिने गहाण ठेवून 40,000 रुपये घेतले होते. या रकमेसाठी मयत महिला सतत तगादा लावत असल्याने रागाच्या भरात आरोपीने मध्यरात्री खून करून दागिने लंपास केले आणि पुण्याकडे पलायन केले. वनिता झुंबर सुरवसे हिला पुढील कारवाईसाठी पोस्टे नळदुर्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक रितू खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि विनोद इज्जपवार, सपोनि सुदर्शन कासार, पोह. शौकत पठाण, पोह. जावेद काझी, पोह. फरहान पठाण, पोह. प्रकाश औताडे, चापोह. सुभाष चौरे, रत्नदिप डोंगरे व नागनाथ गुरव यांच्या पथकाने केली आहे.
