तुळजापूर (प्रतिनिधी)- मध्य प्रदेशचे तंत्रशिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगार विभागाचे प्रधान सचिव मनीष सिंग यांनी आज सपत्नीक श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेतले. त्यांनी पारंपरिक पद्धतीनुसार देवीची ओटी भरत कुलधर्म कुलाचार केले तसेच मनोभावे आरती करून सपत्नीक देवींचे दर्शन घेतले.
मनीष सिंग हे इंदोरचे जिल्हाधिकारी असताना शहरातील स्वच्छता, जनजागृती आणि नागरिक सहभाग वाढवण्यासाठी केलेल्या कामामुळे त्यांना ‘स्वच्छ भारत मिशन (शहरी) – जन भागीदारी’ या उपक्रमांतर्गत २०२० सालचा पंतप्रधान पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. दर्शनानंतर श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानतर्फे तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने यांनी त्यांचा श्री तुळजाभवानी देवीची प्रतिमा व महावस्त्र देऊन यथोचित सन्मान केला. या प्रसंगी सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन चौधर, मंदिर संस्थानचे जनसंपर्क अधिकारी दिनेश निकवाडे, सहायक जनसंपर्क अधिकारी उमाकांत क्षीरसागर, सुजय मेश्राम तसेच मंदिर संस्थानचे इतर कर्मचारी उपस्थित होते.
