धाराशिव (प्रतिनिधी)-  9 वर्षानंतर जिल्ह्यातील आठ नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान होणार आहे. 2 लक्ष 43 हजार 667 मतदार या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावतील.यामध्ये 28 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.8 नगराध्यक्ष आणि 189 सदस्यांची निवड 287 मतदान केंद्रातून करण्यात येणार  आहे.मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजतापर्यंत आहे.निकाल 3 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे.

जिल्ह्यातील अ वर्ग नगरपरिषद असलेल्या धाराशिवसाठी 20 प्रभागातून 1 नगराध्यक्ष व 41 सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. यासाठी 108 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. तुळजापूर नगरपरिषदेत 11 प्रभाग असून 1 नगराध्यक्ष व 23 सदस्यांची निवड होणार आहे. 35 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे.  नळदुर्गमध्ये 10 प्रभागातून 1 नगराध्यक्ष व 20 सदस्य निवडले जाणारे आहेत.त्यासाठी 20 केंद्रावर मतदान होणार आहे.उमरगा येथे 12 प्रभाग असून 1 नगराध्यक्ष व 25 सदस्यांची निवड 37 मतदान केंद्रातून होणार आहे.मुरूममध्ये 10 प्रभागातून 1 नगराध्यक्ष व 20 सदस्यांची निवड 20 मतदान केंद्रातून होणार आहे. कळंब नगरपरिषदेमध्ये 10 प्रभागातून 1 नगराध्यक्ष व 20 सदस्यांची निवड 24 मतदान केंद्रावर होणार आहे.भूम नगरपरिषदेमध्ये एकूण 10 प्रभाग असून 1 नगराध्यक्ष व 20 सदस्यांची निवड 21 मतदान केंद्रातून होणार आहे. परंडा नगरपरिषदेत एकूण 10 प्रभाग असून 1 नगराध्यक्ष आणि 20 सदस्यांची निवड 22 मतदान केंद्रातून होणार आहे.

जिल्ह्यातील एकूण 8 नगरपरिषदेमध्ये एकूण 93 प्रभाग आहे. या प्रभागातून 8 नगराध्यक्ष आणि 189 सदस्यांची निवड 287 मतदान केंद्रातून होणार आहे. 

धाराशिव नगरपरिषदेसाठी 48 हजार 407 पुरुष, 45 हजार 583 स्त्री आणि 16 तृतीयपंथी असे एकूण 94 हजार 6 मतदार आहे.

 तुळजापूर नगर परिषदेसाठी 14 हजार 538 पुरुष,15 हजार 17 स्त्री आणि सहा तृतीयपंथी अशी एकूण 29 हजार 561 मतदार आहे. नळदुर्ग नगरपरिषदेसाठी 8736 पुरुष आणि 8384 स्त्री असे एकूण 17 हजार 120 मतदार आहेत. उमरगा नगरपरिषदेसाठी 16 हजार 231 पुरुष,15 हजार 555 स्त्री आणि पाच तृतीयपंथी असे एकूण 31 हजार 791 मतदार आहे. मुरूम नगरपरिषदेसाठी 7714 पुरुष,7205 स्त्री आणि एक तृतीयपंथी असे एकूण 14 हजार 920 मतदार आहे. कळंब नगरपरिषदेसाठी 10 हजार 713 पुरुष आणि 10 हजार 245 स्त्री मतदार असे एकूण 20 हजार 958 मतदार. भूम नगरपरिषदेसाठी 9228 पुरुष आणि 8849 स्त्री असे एकूण 18 हजार 77 आणि परंडा नगरपरिषदेसाठी 8622 पुरुष आणि 8612 स्त्री असे एकूण 17 हजार 234 मतदार तर या आठ नगर परिषदेसाठी एकूण 1 लक्ष 24 हजार 189 पुरुष,1 लक्ष 19 हजार 450 स्त्री आणि 28 तृतीयपंथी असे एकूण 2 लक्ष 43 हजार 667 मतदार या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहे.


धाराशिव नगरपरिषदेची मतमोजणी ही शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज,धाराशिव. तुळजापूरची मतमोजणी श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय,तुळजापूर. नळदुर्गची मतमोजणी जिल्हा परिषद मुलांची शाळा (सभागृह).उमरग्याची मतमोजणी अंतूबळी पतंगे सभाग्रह. मुरूमची मतमोजणी नगरपरिषद कार्यालय सभागृह,कळंबची मतमोजणी श्री संत गोरोबाकाका शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कळंब,भूमची मतमोजणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आणि परंडा नगरपरिषदेची मतमोजणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वसतिगृह येथे होणार आहे.

नगरपरिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण पुढीलप्रमाणे आहे.धाराशिव : नागरिकाचा मागास प्रवर्ग (महिला),तुळजापूर : सर्वसाधारण,नळदुर्ग : सर्वसाधारण,उमरगा सर्वसाधारण,मुरूम : सर्वसाधारण,कळंब : सर्वसाधारण (महिला),भूम सर्वसाधारण (महिला) व परंडा : नागरिकाचा मागास प्रवर्ग असे आहे.

जिल्ह्यातील आठ नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या नगराध्यक्ष पदाच्या छाननी अंती 76 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले.यामध्ये धाराशिव :13,तुळजापूर :14,नळदुर्ग :7,उमरगा :12, मुरूम : 7, कळंब : 9,भूम :8 आणि परंडा 6 उमेदवारांचा समावेश आहे.

नगराध्यक्षपदाची उमेदवारी मागे घेण्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे 19 नोव्हेंबर रोजी तुळजापूर येथून एका उमेदवाराने अर्ज मागे घेतला.20 नोव्हेंबर रोजी दुसऱ्या दिवशी उमरगा येथून एक आणि परंडा येथून तीन अशा एकूण चार उमेदवारांनी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीतून माघार घेतली.21 नोव्हेंबर रोजी म्हणजे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण 33 उमेदवारांनी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीतून माघार घेतली.त्यामध्ये धाराशिव 7,तुळजापूर 6,नळदुर्ग 1,उमरगा 7,मुरूम 3,कळंब 3,भूम 5 आणि परांडा  एक उमेदवारांचा समावेश आहे.

नगराध्यक्ष पदाच्या निवडणूक रिंगणात आता 38 उमेदवार असून यामध्ये धाराशिव 6,तुळजापूर 7,नळदुर्ग 6,उमरगा 4,मुरूम 4,कळंब 6,भूम 3 आणि परांडा 2 उमेदवारांचा समावेश आहे. नगरपरिषदेच्या सदस्य पदासाठी छाननी अंती 934 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. यामध्ये धाराशिव 257,तुळजापूर 119, नळदुर्ग 104,उमरगा 127,मुरूम 70, कळंब 94,भूम 78 आणि परंडा 85 उमेदवारांचा समावेश आहे.

19 नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेण्याच्या पहिल्या दिवशी तुळजापूर 7 आणि कळंब 1 अशा 8 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. दुसऱ्या दिवशी 20 नोव्हेंबर रोजी 31 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.यामध्ये धाराशिव 1,तुळजापूर 2,नळदुर्ग 4, मुरूम 3,कळंब 6 आणि परंडा 15 उमेदवारांचा समावेश आहे.अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 252 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले.यामध्ये धाराशिव 55,तुळजापूर 48, नळदुर्ग 17,उमरगा 39,मुरूम 10,कळंब 20,भूम 36 आणि परंडा 27 उमेदवारांचा समावेश आहे.  जिल्ह्यातील आठही नगर परिषदेच्या सदस्य पदाच्या निवडणुकीत 643 उमेदवार आपले भाग्य आजमावित आहे.यामध्ये धाराशिव 201, तुळजापूर 62,नळदुर्ग 83,उमरगा 88,मुरूम 57,कळंब 67,भूम 42 आणि परंडा 43 उमेदवारांचा समावेश आहे.

नामनिर्देशन पत्रे मागे घेण्याची अंतिम तारीख 25 नोव्हेंबर 2025 आहे. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम तारीख 21 नोव्हेंबरपर्यंतच होती.अपील असल्यास 21 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर असा कालावधी निवडणूक आयोगाने निश्चित केला आहे.अपीलाचा निर्णय ज्या तारखेस करण्यात येईल,त्या तारखेनंतर तिसऱ्या दिवशी किंवा तत्पूर्वी मात्र 25 नोव्हेंबरपर्यंत आहे.

 
Top