धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांसाठी विविध योजनांचा लाभ देण्यासोबतच सर्व शासकीय इमारतींमध्ये दिव्यांगांसाठी आवश्यक रॅम्प सुविधा उभारण्यात याव्यात,अशा सूचना जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांनी दिल्या.
जिल्हा व्यवस्थापन मंडळ व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रांतर्गत राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी तसेच मतिमंद व बहुविकलांग राष्ट्रीय विश्वस्त कायदा 1999 आणि दिव्यांग हक्क अधिनियम 2016 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आज 11 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या जिल्हा स्थानिकस्तर समितीच्या आढावा बैठकीत श्री.पुजार बोलत होते.
या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, उपमुख्य कार्यकारी अधिकारी देवदत्त गिरी,जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी श्री.बांगर,जिल्हा समाज कल्याण अधिकारी सचिन कवले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकूरकर,दिव्यांग बांधवांचे प्रतिनिधी मयूर काकडे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप कार्यकारी अभियंता व्ही.आर.सुर्यवंशी आदी उपस्थित होते.
दिव्यांग हक्क अधिनियम-2016 च्या अंमलबजावणीअंतर्गत कायदेशीर पालकत्वासाठी आलेल्या अर्जांवर चर्चा करण्यात आली.जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सुरू करण्याकरिता जागा उपलब्ध होण्यासाठी पाठपुरावा,पुढील तीन महिन्यांच्या कामकाजाचे नियोजन,दिव्यांगांचे सर्वेक्षण,तसेच दिव्यांग वित्त विकास महामंडळाकडून विनाअट कर्जमंजुरी या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बँकांमार्फत दिव्यांग व्यक्तींना देण्यात येणाऱ्या बीजभांडवल योजना व इतर योजनांचा आढावा घेण्यात आला. तसेच पाच टक्के दिव्यांग निधीचा खर्च,संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत प्रलंबित दिव्यांग प्रस्ताव,दिव्यांगांना स्वतंत्र घरकूल योजनेचा तात्काळ लाभ मिळवून देणे,200 स्क्वेअर फुट जागा शासन निर्णयानुसार उपलब्ध करणे,अंत्योदय रेशन कार्ड वाटप,आणि दिव्यांगांना वैश्विक ओळखपत्र देणे या बाबीवरही बैठकीत चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकारी श्री.पूजार यांनी सर्व संबंधित विभागांनी दिव्यांगांच्या हक्कांसाठी तत्परतेने काम करून योजनांचा लाभ प्रत्येक पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावा,तसेच समाजाच्या मुख्य प्रवाहात दिव्यांगांचा सहभाग वाढावा,यावर विशेष भर दिला.
