उमरगा (प्रतिनिधी)- तलाठी हे गावाच्या कारभारात महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र जिल्ह्यातील दूरदूरच्या गावांमध्ये तलाठ्यांचे नियमितपणे न येणे ही गंभीर समस्या बनली आहे. अनेक तलाठी शहरातून अप-डाऊन करतात, तर काही ठिकाणी पदभरती रखडल्यामुळे तलाठी कार्यालये ओस पडलेली आहेत. या परिस्थितीमुळे शासकीय योजना, विविध प्रकारचे दाखले, अनुदान मिळवणे अशा अत्यावश्यक कामांसाठी ग्रामस्थांना वारंवार खर्च करूनही निराश होण्याची वेळ येते. कार्यालय गावात असतानाही तलाठी शहरात वास्तव्यास असल्यामुळे, ते प्रत्यक्ष गावात दिसतच नाहीत. त्यामुळे काम कुणाकडून करून घ्यायचं आणि तलाठी सापडायचा तरी कुठे..? असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.
विविध योजनांची अंमलबजावणी करणाऱ्या महसूल विभागातच कर्मचाऱ्यांची टंचाई आहे. काही ठिकाणी तर तहसीलदारांनी एका तलाठ्याला दोन गावे देऊन प्रभारी वर कामचलाऊपणा सुरू केल्याचे दिसत आहे. तलाठी कार्यालय गावात आहे पण साहेब शहराच्या ठिकाणी वास्तव्य करीत असल्याचे समजते. त्यामुळे गावगाडा रखडला असल्याचे दिसत आहे..!
उमरगा तालुक्यात 80 ग्रामपंचायत असून 96 गावे आहेत. तलाठ्यांची संख्या मात्र केवळ 35 असल्यामुळे अनेक गावांमध्ये तलाठीच नेमले गेलेले नाहीत. जेथे तलाठी कार्यरत आहेत, तेथे ते नियमितपणे गावात उपस्थित राहत नाहीत. शासनदरबारी एकुण 41 तलाठ्यांचे पदे मंजूर असताना प्रत्यक्षात मात्र केवळ 35 तलाठ्यांवर भार घालून कामे केली जात आहेत. या परिस्थितीमुळे ग्रामविकासाच्या कामांमध्ये अडथळा निर्माण झाला आहे. तलाठ्यांची पदे सज्जे 41 मंजूर आहेत. पण सुंदरवाडी, कोराळी, समुद्राळ, केसरजवळगा, तुरोरी आणि सावळसुर या सहा तलाठी सज्जाचे पदे रिक्त आहेत. त्यामुळे 35 जणांवर तालुक्यातील गावगाड्याचा भार वाहीला जात आहे.
तलाठी साहेब आज कुठे...? जिल्ह्यातील बहुतांश गावांमधील तलाठी गावात वास्तव्यास न राहता शहरातून अप-डाऊन करतात. आज तलाठी साहेब गावात येणार की नाही, सध्या ते कुठे आहेत. याची ना ग्रामस्थांना कल्पना असते, ना कुठे कोणतीही अधिकृत सूचना दिसते. त्यामुळे शासकीय कामांसाठी आलेल्या ग्रामस्थांना तलाठ्यांचा शोध घेत गावागावात भटकावे लागते.
नागरिकांची वणवण...!
कोणत्याही योजनेची माहिती किंवा अर्ज भरताना, विविध योजनेचे अनुदान आले किंवा नाही यासह विविध कागदपत्रे हवे असल्यास ग्रामस्थांना तलाठ्यांच्या शोधात वणवण भटकावे लागत आहे. विशेष म्हणजे एका एका तलाठ्याला दोन गावे दिलेली आहेत. त्यामुळे साहेब कुण्या गावात आहेत की आज आलेच नाहीत याचा शोधच लागत नाहीत. उमरगा येथे मुख्य कार्यालय असले तरीही ते वास्तव्यास मात्र बहुतांश तलाठी लातूरला, तुळजापूर, धाराशिव, सोलापूर येथे राहतात. त्यामुळे ते जरी नाही आले व त्यांना फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर ते उमरग्याला मीटिंग असल्यामुळे आलोच नाही असे सांगून आपली जबाबदारी झटकतात.
उमरगा शहरातून अप-डाऊन; 4 वाजता तलाठी गायब...!
उमरगा लोहारा तालुक्यातील अनेक गावांमधील तलाठी मुख्यालयी न राहता अपडाऊन करतात. चार-साडेचार वाजले की तलाठी गायब होतात. नंतर ते चार-आठ दिवसानंतरच येत असल्याने तसेच काही तलाठी नेमून दिलेल्या दिवशीच गावकऱ्यांना दर्शन देत असल्याने गावागावांतील नागरिकांचे कामे प्रभावित होत आहेत.
काही तलाठ्यांचे नियमित गावांना भेटी...!
काही तलाठी 'अप-डाऊन' करीत असले तरी काही तलाठी नियमित गावांत भेट देऊन नागरिकांची कामेही करताना दिसून येत आहेत.
गावात 'डमी' तलाठी....
काही गावात तलाठी वेळेवर पोहोचत नसल्याने तलाठ्यांनी गावात एक खाजगी व्यक्ती ठेवला आहे. तलाठ्याचे कामे बहुतांश या डमी तलाठ्याकडून होत आहेत. याबाबत नायब तहसीलदार महसूल डॉ. अमित भारती व जी. एस. पारीसकर यांना विचारले असता ते म्हणाले की, काही दिवसातच प्रत्येक तलाठी सज्जाला तलाठी भवनाचे बांधकाम दुरूस्ती सुरू आहे. तसा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास रितसर पाठवले आहे. त्यानंतर त्या ठिकाणी सर्व कामकाज सुरळीत चालू होईल असे सांगून वेळ मारून नेले.
