धाराशिव (प्रतिनिधी)- लातूर - बार्शी - पुणे महामार्गावरील ढोकी येथे ट्रॉमा केअर युनिट सुरू करण्यात यावे अशी मागणी शिवसेनेचे राज्य आंदोलन समन्वयक ॲड.  तुकाराम शिंदे यांनी पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्याकडे केली आहे. त्याचबरोबर राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनाही निवेदन देऊन मागणीकडे लक्ष वेधले. दोन्ही मंत्री महोदयांनी ट्रॉमा केअर युनिटबाबत सकारात्मक भूमिका घेतली असल्याची माहिती  ॲड.  तुकाराम शिंदे यांनी दिली.

मुंबई येथे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक व राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन ॲड. तुकाराम शिंदे यांनी मंगळवारी (दि.11) सादर केले. या निवेदनात म्हटले आहे की, लातूर - बार्शी - पुणे ते मुंबई महामार्गावरील 15 ते 16 गावाचा संपर्क असणारे आणि हायवेलगत असलेले  ढोकी गाव साखर कारखाना व गाव ही महत्त्वाची वर्दळीची ठिकाणे आहेत. दररोज हजारो लोक या मार्गावरून विविध वाहनांतून ये-जा करतात. दिवसेंदिवस वाहनांची व प्रवाशांची संख्या वाढत असल्याने अपघातांची व त्यातील जखमी रुग्णांची संख्या वरचेवर वाढत आहे. त्यामुळे अपघातग्रस्त व जखमी रूग्णांना तात्काळ योग्य ते उपचार वेळेवर मिळण्यासाठी ढोकी येथे अस्थिरोगतज्ञासह ट्रॉमा केअर युनिटची म्हणजेच अपघात विशेषोपचार केंद्राची नितांत आवश्यकता आहे. सध्या विशेष बाब म्हणून ग्रामीण रुग्णालय मंजूर झाले असून  त्याचे काम प्रगतीपथावर आहे. आता ढोकी पीएचसीच्या जागी विशेष बाब म्हणून तात्काळ ट्रॉमा केअर युनिट मंजूर करण्याबाबत संबंधीत अधिकाऱ्यांना आदेशीत करावे, असे निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे.


 
Top