ढोकी (प्रतिनिधी)- महिलेचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतुने मृतदेह पेटवून विल्हेवाट लावण्याचा प्रकार धाराशिव तालुक्यातील ढोकी शिवारात आढळून आला आहे. गावपासून अडीच किलोमीटरवर रेल्वे फाटकानजिक जळालेल्या अवस्थेतील मृतदेह गुरूवारी सकाळी आढळून आला. दरम्यान जिल्ह्यात असा जळालेला मृतदेह आढळण्याची आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे असा मृतदेह आढळला होता. या दोन्ही घटनांचा परस्पर संबंध आहे का, याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.
ढोकीपासून धाराशिवला जाणाऱ्या रस्त्या नजिक उजव्या बाजूस अर्धवट अवस्थेत जळालेला महिलेला मृतदेह आढळून आला. यावेळी येथील स्थानिकांनी ढोकी पोलिस ठाण्यात खबर दिल्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक विलास हजारे, पोलिस उपनिरीक्षक अनिल तांबडे व पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. प्राथमिक तपासानुसार घटना बुधवारी मध्यरात्रीच्या नंतर घडली असा अंदाज व्यक्त केला जात आहे. परंतु सध्या साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू असल्याने वाहनांची संख्या मोठी आहे. गर्दी कमी होण्याचा अंदाज घेत आरोपीने महिलेचा अन्यत्र खून करून मृतदेह येथे जाळल्याचा संशय व्यक्त होत आहे. महिला विवाहित असल्याचा प्राथमिक अंदाज असून, महिलेचे वय 19-23 वर्ष आहे. शरीर अर्धवट जळालेल्या अवस्थेत आहे. पायात पैजण व जोडवे आहेत. आत दोन स्वतंत्र तपास पथके तयार करून ढोकी तसेच शेजारील हद्दीत तपास सुरू आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार तपास वेगाने करण्यात येत आहे. तसचे परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहणी करण्यात येत असल्याचे एपीआय हजारे यांनी सांगितले.