धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील आठ नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून या निमित्ताने राज्य सरकारने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. या संदर्भातील अधिसूचना शासनाच्या वतीने जारी करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील भूम, कळंब, मुरूम, नळदुर्ग, तुळजापूर, धाराशिव, परांडा आणि उमरगा या नगरपरिषदांसाठी मतदानाची प्रक्रिया 2 डिसेंबर या दिवशी पार पडणार आहे. शासनाच्या अधिसूचनेनुसार मंत्रालयातील सर्व विभागांनी ही माहिती आपल्या प्रशासकीय नियंत्रणाखालील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये, महामंडळे, मंडळे तसेच इतर संबंधित संस्थांना कळविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, या निवडणुकीच्या मतदारसंघाबाहेर कामासाठी नियुक्त असलेले मतदार देखील या सार्वजनिक सुट्टीचा लाभ घेऊ शकतील. मतदान असलेल्या नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रातील केंद्र शासनाची कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका आदींना देखील ही सुट्टी लागू राहणार आहे.
निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी व मतदारांची सोय व्हावी या हेतूने शासनाने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, माहिती व जनसंपर्क विभागाला ही अधिसूचना सर्व वृत्तपत्रे व प्रसारमाध्यमांद्वारे व्यापकपणे प्रसिद्ध करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही सार्वजनिक सुट्टी महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार जाहीर करण्यात आली असून अधिसूचना हेमंत महाजन, उप सचिव, शासन यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आली आहे. 2 डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानासाठी सर्व मतदारांनी उत्साहाने मतदान करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.