धाराशिव (प्रतिनिधी)-  येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षातंर्गत राष्ट्रीय सेवा योजना व राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. 

प्राचार्य डॉ. संदीप देशमुख व मान्यवरांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर, शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे, संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांना अभिवादन करण्यात आले. तसेच संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रमुख व्याख्याते रवि केसकर पुढे म्हणाले की, भारतीय संविधानाने व्यक्तीची प्रतिष्ठा, समानता, स्वातंत्र्य, बंधुता व सामाजिक न्याय या मूलभूत तत्वांना स्थान दिले. संविधानातील प्रस्तावनेपासूनच भारतीय लोकशाहीची ओळख समाजवादी, पंथ निरपेक्ष, लोकशाही प्रजासत्ताक अशी देण्यात आली आहे. मूलभूत हक्कांनी सर्वांना समानतेचा अधिकार, शोषणाविरुद्ध संरक्षण, सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार प्राप्त झाला आहे. शेवटी ते म्हणाले की, संविधानाच्या मूलभूत कर्तव्यामध्ये नागरीकांना देशभक्ती, सामाजिक सलोखा, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि मानवतावादी बंध यांचे पालन करण्याचा अनमोल संदेश त्यांनी यावेळी दिला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रमाधिकारी डॉ. दत्तात्रय साखरे, प्रा. मोहन राठोड, प्रा. मोहिते, डॉ. सी. आर. दापके तसेच स्टाफ सेक्रेटरी डॉ. बालाजी गुंड यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे संपन्न झाला.


 
Top