धाराशिव(प्रतिनिधी)- जिल्ह्यातील नागरिकांचे जीवनमान उंचावले पाहिजे. दरडोई उत्पन्न देखील वाढले पाहिजे. आकांक्षित जिल्ह्याची ओळख मिटवण्यासाठी आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्ह्यातील विविध प्रकल्प आणि विविध विकासकामे यंत्रणांनी मुदतीत पूर्ण करावी.असे निर्देश वस्त्रोद्योग, सहकार व पणन विभागाच्या प्रधान सचिव तथा पालक सचिव श्रीमती.अंशू सिन्हा यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात 7 नोव्हेंबर रोजी विविध यंत्रणांचा आढावा घेताना श्रीमती सिन्हा बोलत होत्या. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती शोभा जाधव,जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.निलेश काळे,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अनुप शेंगुलवार,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकूरकर, जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्रीमती सिन्हा म्हणाल्या की,जिल्ह्यात यावर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे शेतपिकांचे, सार्वजनिक व खाजगी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे.अतिवृष्टी व पूरबाधित शेतकऱ्यांना मदत करण्यात येत आहे. कोणताही बाधित हा मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. संबंधितांच्या बँक खात्यात शासनाकडून देण्यात येणाऱ्या मदतीची रक्कम वेळेत जमा करण्यात यावी.शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दयावे.जिल्ह्यातील शेतकरी हा मोठ्या प्रमाणात रेशीम शेतीकडे वळला पाहिजे, यासाठी चालना देण्यात यावी.तसेच मागील वर्षी पडलेल्या अवेळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेती पिकांच्या अनुदानाची मदत वाटप शेतकऱ्यांच्या खात्यात वेळेत जमा करावी. ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी करणे प्रलंबित असल्यामुळे मदत करता आलेली नाही,त्या शेतकऱ्यांची पोर्टलवरील प्रलंबित ई-केवायसी त्वरित पूर्ण करावी,असे श्रीमती.सिन्हा म्हणाल्या.

जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तिपीठ महामार्गासाठी ज्या गावातील शेतकऱ्यांचे भूसंपादन करावयाचे आहे,त्यासाठी संबंधित शेतकऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांना भूसंपादनासाठी प्रोत्साहित करावे,असे सांगून श्रीमती सिन्हा म्हणाल्या की,त्यामुळे राज्य शासनाचे महत्त्वपूर्ण प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यास मदत होणार आहे.श्री जिल्ह्यातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग व रेल्वे प्रकल्पाच्या अनुषंगाने प्रलंबित असलेली कामे प्राधान्याने पूर्ण करावी.जिल्ह्यातील कोणताही शेतकरी हा ॲग्रीस्टेक नोंदणीपासून वंचित राहणार नाही याकडे लक्ष द्यावे.भविष्यात सर्व कृषी योजनांचा लाभ ॲग्रीस्टेक क्रमांकाच्या माध्यमातून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी पुजार यांनी जिल्ह्यात सप्टेंबर-2025 मध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेतजमिनीच्या नुकसानीची मदत वाटपाची माहिती दिली. प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी भरलेला पिक विमा, अतिवृष्टीमुळे 2109 विहिरींचे नुकसान झाले असून 1397 विहिरी ह्या पूर्णतः खचून अथवा वाहून गेलेल्या आहेत व 712 विहिरींचे अंशतः नुकसान झाले असल्याचे सांगितले.जिल्ह्यातील विविध प्रकल्पांच्या आणि विविध विकासकामांच्या सद्यस्थितीबाबतची माहिती श्री.पुजार यांनी यावेळी दिली. या बैठकीत उपस्थित विविध विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी त्यांच्या विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या प्रकल्प व विकासकामांच्या प्रगतीबाबतची माहिती यावेळी दिली.


 
Top