धाराशिव (प्रतिनिधी)- शेतकऱ्यांनी दिलेल्या न्यायालयीन लढ्याला यश आले आहे. ठाकरे सरकारच्या उदासिनतेमुळे प्रलंबित असलेल्या 2020 सालच्या पीक विम्याचा मार्ग आता सुकर झाला आहे. उच्च न्यायालयाने विमा कंपनीच्या विरोधात निकाल देत न्यायालयात जमा असलेले 75 कोटी रूपये व्याजासह तातडीने शेतकऱ्यांना वितरीत करण्याचे आदेश दिले आहेत, तसेच विमा कंपनीची राज्य सरकारने रोखलेली देय रक्कमही शेतकऱ्यांना देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे आणखीन 220 कोटी रूपये मिळणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
ठाकरे सरकार सत्तेत असताना सन 2020 सालच्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे सोयाबीन पीकाचे काढणी पश्चात प्रचंड नुकसान झाले होते. मात्र जुजबी तांत्रिक कारणे देत बजाज अलायन्स या खासगी विमा कंपनीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास नकार दिला होता. तत्कालीन ठाकरे सरकारकडे याबाबत आपण वारंवार पाठपुरावा केला. मात्र त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे सहकार्य मिळाले नाही. त्यामुळे नाईलाजास्तव आपण न्यायालयात धाव घेतली. अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत जावून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा दिला. न्यायालयाच्या आदेशानुसार आजवर खरीप 2020 च्या नुकसानीपोटी विमा कंपनीच्या माध्यमातून 289 कोटी रूपये शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आले आहेत. मात्र त्यानंतर जवळपास 220 कोटी रूपये शेतकऱ्यांना देणे अपेक्षित असतानाही विमा कंपनीकडून जाणिवपूर्वक टाळाटाळ केली जात होती. ही उर्वरित रक्कम मिळावी यासाठी उच्च न्यायालयात लढा सुरू होता. आपले महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर राज्य सरकारच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ नियुक्त करण्यात यावा, अशी मागणी आपण केली होती. त्यानुसार जेष्ठ विधीज्ञ ॲड. धोर्डे पाटील यांना नियुक्त करण्यात आले होते. जेष्ठ विधीज्ञ ॲड. व्ही. डी. साळुंके आणि ॲड. राजदीप राऊत यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या या लढ्याला यश आले आहे. विमा कंपनीने न्यायालयात जमा केलेली 75 कोटी रूपयांची रक्कम व्याजासह शेतकऱ्यांना वितरीत करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. तर विमा कंपनीला राज्य सरकारकडून देय असलेले 134 कोटी रूपये देखील शेतकऱ्यांना वितरीत करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
आपल्या मागणीप्रमाणे या निकालामुळे जिल्ह्यातील 3 लाख 33 हजार 412 शेतकऱ्यांना अधिकची नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. उच्च न्यायालयातील जेष्ठ विधीज्ञ ॲड. व्ही. डी. साळुंखे, ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. धोर्डे पाटील, ॲड. राजदीप राऊत, सर्वोच्च न्यायालयातील ॲड. चौधरी, या सर्वांचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे बहुमोल सहकार्य आणि मार्गदर्शन लाभल्याबद्दल आमदार पाटील यांनी शेतकऱ्यांच्या वतीने आभार व्यक्त केले आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर झालेला अन्याय दूर करण्यासाठी शेतकऱ्यांनी दिलेल्या या प्रदीर्घ लढ्याला यश आल्याबद्दल सर्व शेतकऱ्यांचेही अभिनंदन करून आमदार पाटील यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अन्यायाविरूध्द ताकदीने लढलो आणि जिंकलो, याचे समाधान वर्णनापलीकडे आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिरिक्त 220 कोटी रूपये मिळणार, याचे मोठे समाधान असल्याची भावनाही आमदार पाटील यांनी व्यक्त केली आहे.
