भूम (प्रतिनिधी)- भूम तालुक्यातील पखरूड सारख्या छोट्याशा गावाने महाराष्ट्राच्या नकाशावर पुन्हा एकदा आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या गावातील लाडकी लेक पूजा चव्हाण हिने केवळ २३ व्या वर्षी सायबर क्षेत्रात विक्रम घडवून आणत संपूर्ण तालुका व जिल्ह्याचे नाव उज्वल केले आहे.
इ.डी. ऑफिस, मुंबई येथे सायबर अॅडव्हायझर म्हणून कार्यरत असलेल्या पूजाने नुकताच एक महत्त्वाचा प्रकल्प पूर्ण केला—पेसमेकरला लागणारे अत्यावश्यक सॉफ्टवेअर विकसित केले, ज्यामुळे पूर्वी ३ ते ४ लाख रुपये किमतीची असणारी उपकरणे आता फक्त ४० ते ५० हजार रुपयांत उपलब्ध होणार आहेत. हे कार्य आरोग्य क्षेत्रातील क्रांती मानले जात असून पूजाच्या तांत्रिक कौशल्याची देशभरात प्रशंसा होत आहे.
साध्या कुटुंबातील—आई लता आणि वडील आश्रुबा रघुनाथ चव्हाण (माटकर)—यांच्या मुलीने कमी संसाधनांतून मोठी झेप घेतली आहे. तिच्या नावावर ए.पी.जे. अब्दुल कलाम पुरस्कार, सावित्रीबाई फुले महाराष्ट्र मम्मग्ररिक पुरस्कार यांसह अनेक सन्मान नोंदले गेले आहेत. भारतामधील सर्वात लहान वयाची CISO (चीफ इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ऑफिसर) म्हणूनही पूजाची ओळख आहे. महाराष्ट्रातील अनेक महाविद्यालये व शाळांमध्ये तिने युवकांना प्रेरणादायी मार्गदर्शन दिले असून तिची जिद्द, मेहनत आणि धडाडी तरुणांना मार्गदर्शक ठरत आहे. पूजा चव्हाणच्या या अद्वितीय यशाचा गौरव करण्यासाठी पखरूड गावातील नागरिकांच्या वतीने भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. गावकऱ्यांच्या मते, “पूजा ही आमची लाडकी लेक, गावाची शान, तालुक्याची बाण आणि महाराष्ट्राची जान आहे.” पखरूड हे गाव स्वतःच्या शौर्यपरंपरेसाठी ओळखले जाते—महाराष्ट्रात सर्वाधिक आर्मी ऑफिसर्स घडवणारे गाव म्हणून त्याची ख्याती आहे. आता त्याच मातीतून पूजा चव्हाणसारखा हिरे जन्माला आल्याचा गावकऱ्यांना अभिमान वाटतो. पूजाच्या ‘टीम जगदंबा’च्या भावी वाटचालीसाठी संपूर्ण गावकऱ्यांकडून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत. गाव, तालुका आणि महाराष्ट्राचे नाव जगभरात नेण्यासाठी पूजा अशीच भरारी घ्यावी, अशी अपेक्षा समस्त गावकऱ्यांनी केली आहे.
