धाराशिव (प्रतिनिधी)-  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव येथे प्रवेशित वर्ष 2025-26 च्या 100 एमबीबीएस विद्यार्थ्यांचा व्हाईट कॉट सेरिमनी हा समारंभ 11 नोव्हेंबर 2025 रोजी उत्साहात पार पडला. या समारंभात विद्यार्थ्यांना प्रतीकात्मक पांढरा ॲप्रन प्रदान करून डब्ल्यु एच ओ नुसार विद्यार्थ्यांनी वैद्यकीय प्रतिज्ञा घेतली. या प्रतिज्ञेद्वारे त्यांनी भविष्यात जबाबदार,कुशल व नैतिकतेचे पालन करणारे डॉक्टर होण्याचे वचन दिले.

समारंभास शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.शैलेंद्र चौहान, उप-अधिष्ठाता डॉ.शफीक मुंडेवाडी,विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग,विद्यार्थी तसेच विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान डॉ.योगिता सुलक्षणे,सहयोगी प्राध्यापक, शरीरक्रियाशास्त्र विभाग यांनी संस्थेच्या प्रमुखांची ओळख उपस्थितांना करून दिली.त्यानंतर डॉ. शैलेंद्र चौहान यांनी विद्यार्थ्यांना समारंभाचे महत्त्व स्पष्ट करत वैद्यकीय व्यवसायातील जबाबदारी, नैतिकता आणि सेवाभाव याबाबत मार्गदर्शन केले. या प्रसंगी मंचावर विभागप्रमुख डॉ. पुष्पा अग्रवाल (बधिरीकरणशास्त्र विभाग), डॉ.धाबे (जीवरसायनशास्त्र), डॉ.स्वाती पांढरे (शरीररचनाशास्त्र), डॉ.चारुशिला हलगरकर (सूक्ष्मजीवशास्त्र), डॉ.लगदीर गायकवाड (औषधवैद्यकशास्त्र), डॉ.चेतन राजपूत (सहाय्यक प्राध्यापक,शरीरक्रियाशास्त्र) तसेच डॉ. विवेक कोळगे (प्रशासकीय अधिकारी) उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्राची जाधव व कु.निशा शिंदे यांनी मानले.या कार्यक्रमाद्वारे नव्या विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय प्रवासाची औपचारिक सुरुवात होताच,परिसरात अभिमान आणि प्रेरणेचे वातावरण निर्माण झाले.

 
Top