धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,आनंद साधना प्रकल्प महाराष्ट्र आणि श्री स्वामी समर्थ मूकबधिर निवासी शाळा,धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी आनंद साधना प्रकल्पाच्या वतीने दिव्यांग विद्यार्थ्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्या.श्रीमती भाग्यश्री पाटील या उपस्थित होत्या.त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात आनंद साधना प्रकल्पाने दिव्यांग बांधवांसाठी केलेली मदत आदर्शवत असल्याचे गौरवोदगार काढले.तसेच दिव्यांग बांधवांनी कायदेशीर सल्ला व मार्गदर्शनासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाशी संपर्क साधावा,असे आवाहन केले.
यावेळी श्रीमती पाटील यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचा मोफत टोल-फ्री क्रमांक 15100,बौद्धिक व मानसिक विकलांगांसाठी 14446, तसेच बालकांसाठीच्या मदतवाणी 1098 या क्रमांकांची माहिती दिली. तसेच राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या दिव्यांग व बालकलाभिमुख योजनांबद्दलही जनजागृती करण्यात आली. आनंद साधना प्रकल्पाचे संस्थापक ॲड.अजित कुलकर्णी यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या मदत व पुनर्वसन कार्यात प्रकल्प सदैव तत्पर असल्याचे सांगितले.या कार्यक्रमास प्रशिक्षित मध्यस्थ शकिल शेख, सुधीर रणशूर, मुख्याध्यापक, तसेच स्थानिक नागरिक,पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात अतिवृष्टी बाधित,दिव्यांग विद्यार्थ्यांना जीवनावश्यक वस्तूंचे किट भाग्यश्री पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.यावेळी विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांपैकी अथर्व कोकाटे,महेश देवकुळे आणि नंदिनी घोगरे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान चौगुले यांनी केले. तर दुभाषक म्हणून रेखा ओहोळ यांनी काम पाहिले. प्रास्ताविक व आभारप्रदर्शन ॲड. अजित कुलकर्णी यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी भीमराव पाथरूड, विठ्ठल व्होरडे,संजय म्हमाणे,नागेश चव्हाण आणि श्रीराम पाटील यांनी परिश्रम घेतले.