भूम (प्रतिनिधी)- भूम नगरपरिषदेची येत्या 2 डिसेंबर रोजी होणारी सार्वत्रिक निवडणूक ही यंदा थेट दोन आघाड्यांमध्ये आलमप्रभू शहर विकास आघाडी (संजय गाढवे गट) व जनशक्ती नगर विकास आघाडी (विजयसिंह थोरात गट) सरळ सामना होणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसू लागले आहे. या निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असल्याने दोन्ही आघाड्यांनी आपल्या “शक्तीस्थानां”ना पुढे केले आहे.
आलमप्रभू आघाडी कडून माजी नगराध्यक्ष संयोगिता संजय गाढवे या निवडणूक रिंगणात उतरणार असून, त्यांच्या पती व माजी नगराध्यक्ष संजय गाढवे, चिरंजीव साहिल गाढवे व कन्या डॉ. सई गाढवे यांच्यासह शहरातील प्रत्येक घरात जाऊन प्रचार करताना सध्या दिसत आहेत.
दरम्यान, विरोधकांकडून जनशक्ती नगर विकास आघाडीकडून माजी नगराध्यक्ष श्रीमंत विजयसिंह थोरात यांचे छोटे बंधू राजे श्रीमंत धनाजी थोरात यांच्या धर्मपत्नी ससत्वशीला धनाजी थोरात या नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारीसाठी सज्ज झाल्या आहेत. त्यांच्या पाठीशी काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार गट) व शिवसेना (उबाटा गट) या पक्षांचा मजबूत पाठिंबा असल्याचे दिसत आहे.
थोरात यांच्या प्रचारासाठी माजी नगराध्यक्ष विजयसिंह थोरात, धनाजी थोरात यांचे चिरंजीव ॲड. यशवंत थोरात, भाजप नेते बाळासाहेब क्षिरसागर, माजी आमदार राहुल मोटे, शिवसेना उभाटा गटाचे तालुकाप्रमुख अनिल शेंडगे, काँग्रेस तालुकाध्यक्ष रुपेश आप्पा शेंडगे तसेच भाजप तालुका अध्यक्ष संतोष सुपेकर हे प्रचारात सक्रिय झाले आहेत. शहरातील विविध प्रभागांत दौरे, बैठकांची रेलचेल आणि कार्यकर्त्यांच्या मोर्चांनी निवडणुकीचे तापमान वाढले आहे.
दरम्यान, अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून अद्याप कोणत्याही उमेदवाराने अर्ज दाखल केलेला नाही. मात्र दोन्ही आघाड्यांच्या कार्यकर्त्यांकडून “मला तिकीट द्या, मला संधी द्या“ असा आग्रह वाढला आहे. अनेक इच्छुक नगरसेवक उमेदवारांनी सोशल मीडियावर प्रचाराची सुरुवात केली असून, पोस्टरबाजी आणि बॅनरबाजी सुरू झाली आहे. भूम नगरपरिषदेची ही निवडणूक म्हणजे आलमप्रभू विरुद्ध जनशक्ती अशी थेट लढत ठरणार आहे. यंदा दोन्ही आघाड्यांपैकी कोण नवा चेहरा पुढे करते आणि कोण पुन्हा जुन्या नगरसेवकांवर विश्वास ठेवते, हेच आगामी निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे.

