धाराशिव (प्रतिनिधी)- रविराज साबळेपाटील यांच्या हत्येप्रकरणी सोशल मीडियावरून सुरू असलेल्या भ्रामक, दिशाभूल करणाऱ्या आणि समाजात फूट पाडणाऱ्या प्रचाराविरोधात प्रहार अपंग क्रांती आंदोलन (महाराष्ट्र राज्य) तर्फे आज धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निषेध नोंदविण्यात आला.

जिल्हाध्यक्ष मयूर काकडे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्ते एकत्र जमले आणि प्रशासनाविरुद्ध प्रखर घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. “प्रशासन जागं हो! दोषींवर कारवाई करा!” अशा घोषणांनी वातावरण तापले.

यावेळी बाळासाहेब कसबे, महेश माळी, दिनेश पोतदार, इसाक शेख, शब्दार्थ सय्यद, इलाही शेख, सिद्राम पवार, नागराज मसरे, पैगंबर मुलानी, धनंजय खांडेकर, विकास शिरसागर, गौतम दुधे, बाबासाहेब भोईटे, दत्ता पवार, विठ्ठल चव्हाण, नाना इंगळे आदींसह प्रहारचे शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की, काही व्यक्ती सोशल मीडियाद्वारे शेतकरी समाजात तणाव निर्माण करण्यासाठी खोटे आरोप व भडकावू पोस्ट्स करत आहेत. या समाजविघातक कृतींवर तात्काळ कारवाई करून संबंधितांवर IT Act आणि BNS कलम 197(1)( D) नुसार गुन्हे दाखल करावेत, अशी ठाम मागणी संघटनेने केली. जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारत आवश्यक ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले असले तरी, संघटनेने स्पष्ट इशारा दिला. जर शासनाने तत्काळ कारवाई केली नाही, तर पुढील पाऊल अधिक तीव्र असेल.

 
Top