धाराशिव (प्रतिनिधी)- दि. 17 नोव्हेंबर 2025 रोजी जे. एफ. अजमेरा रोटरी नेत्र रुग्णालय (धर्मादाय), धाराशिव यांच्या वतीने कळंब येथे नव्याने स्थापन करण्यात आलेल्या नेत्रसेवा केंद्राचे भव्य उद्घाटन मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न झाले. उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे आणि उद्घाटक म्हणून रोटरी डिस्ट्रिक्ट 3132 चे प्रांतपाल सुधीर लातुरे उपस्थित होते. त्यांच्या शुभहस्ते या नेत्रसेवा केंद्राचे लोकार्पण करण्यात आले.
केंद्र स्थापनेचा उद्देश : कळंब शहर तसेच परिसरातील खेड्यांतील गोरगरीब आणि गरजू नागरिकांना सुलभ, परवडणारी व गुणवत्तापूर्ण नेत्रसेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देणे हा या व्हिजन सेंटर स्थापनेमागील मुख्य हेतू आहे. समारंभात प्रांतपाल सुधीर लातुरे यांनी या उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक केले. त्यांनी गरजू व गोरगरीब लोकांसाठी हे केंद्र अत्यंत उपयुक्त ठरेल, असे सांगितले. कळंब रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. अभिजीत जाधवर यांनी उद्घाटन सोहळ्याला शुभेच्छा देऊन या केंद्रामुळे स्थानिक नागरिकांना मोठा फायदा होईल, असे मत व्यक्त केले.
उपप्रांतपाल प्रदीपजी मुंडे यांनी व्हिजन सेंटरमधून रुग्णांना देण्यात येणाऱ्या विविध सेवा, तपासण्या व सुविधा यांची माहिती रोटेरियन आणि नागरिकांना दिली.
धाराशिव रोटरी क्लबचे अध्यक्ष रणजीत रणदिवे यांनी, या नव्या केंद्रामुळे रोटरी नेत्र रुग्णालयाच्या सेवेला एक नवीन बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
रोटरी सेवा ट्रस्टचे सचिव पी. आर. काळे यांनी रुग्णालयात विविध सरकारी योजनांअंतर्गत दिल्या जाणाऱ्या नेत्र शस्त्रक्रिया व उपचारांची माहिती उपस्थितांना दिली. या प्रसंगी धाराशिव रोटरी क्लबचे पदाधिकारी अध्यक्ष रणजीत रणदिवे, सचिव पी. आर. काळे, पी. के. मुंडे, सुनील गर्जे, इंद्रजीत आखाडे, तसेच कळंब येथील सर्व रोटेरियन, शहरातील विविध डॉक्टर्स आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
