धाराशिव (प्रतिनिधी)-  विद्यार्थी दशेतूनच विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून सर्व गोष्टींचा अभ्यास करावा. त्या आयुष्यभर लक्षात राहतात.फक्त विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनीच संशोधन करावे असे नसून,सार्वजनिक व वैयक्तिक जीवनातील दैनंदिन घटना वैज्ञानिक दृष्टीने पाहून त्यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे,असे प्रतिपादन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले.

आज 17 नोव्हेंबर रोजी लोहारा तालुक्यातील हराळी येथील ज्ञान प्रबोधिनी विद्यालयात 2023-24 व 2024-25 या दोन वर्षांसाठी आयोजित इन्स्पायर अवार्ड प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी पुजार बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुधा साळुंके, गुजरात येथील इनोव्हेशनच्या परीक्षक शिवानी सिंग, उपशिक्षणाधिकारी दत्तात्रय लांडगे,उमरगा गटविकास अधिकारी राजपूत,लोहाराचे शिवकुमार बिराजदार,शिक्षण विस्तार अधिकारी संतोष माळी, लातूर येथील बी.के.हाश्मी, राऊत, देवगुडे, ज्ञान प्रबोधिनीच्या गौरी कापरे, परीक्षक डॉ.प्रवीण काळे आदी मान्यवर यांची मंचावर प्रामुख्याने उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी पुजार म्हणाले की, पूर्वी प्रयोग करण्यासाठी किंवा मनातील कल्पनांना वैज्ञानिक रूप देण्यासाठी शालेयस्तरावर कोणत्याही सोयी उपलब्ध नव्हत्या.मात्र आज जिल्हा परिषदेच्या प्राथमिक ते माध्यमिक शाळांपर्यंत ग्रामीण व शहरी भागात प्रयोग व अभ्यासासाठी सर्व सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. बदलत्या काळानुसार दैनंदिन जीवनातील साहित्याचा वापर करून प्रयोग करता येतात.मनातील कल्पनांना वास्तवात उतरविणे ही प्रेरणादायी बाब असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.घोष, शिक्षणाधिकारी साळुंके यांचेही भाषण झाले. ज्ञान प्रबोधिनी विद्यालयातील विद्यार्थिनीनी स्वागतगीत व विज्ञानगीत सादर केले.प्रास्ताविक शिक्षणाधिकारी साळुंके यांनी केले. सूत्रसंचालन सतीश कानडे यांनी केले.आभार जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष स्वामी यांनी मानले. यावेळी धाराशिव,लातूर व नांदेड जिल्ह्यातील विद्यार्थी, शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


199 विविध विज्ञान प्रयोगांचे प्रदर्शन

या प्रदर्शनात ‌‘वॉटर ट्रस्ट कलेक्टर',‌‘ट्रॅफिक वाइज कंट्रोलर',‌‘फायर फायटिंग रोबोट', रस्त्यावरील वाहनांचे वजन मोजणे', ‌‘वृद्ध-अंध-अपंगांचा जीवनसाथी',‌‘लेझर सिक्युरिटी',‌‘हाऊस फोनचा आवाज वाढविणे',‌‘आंधळ्याची काठी', ‌‘आधुनिक कांदा शीतगृह',‌‘रेल्वे ट्रॅक ओळख सूचना प्रणाली',‌‘हाताने पेपर तयार करणे',‌‘छातीचा कॅन्सर टाळण्यासाठी सेन्सर',‌‘रेल्वे इंटरलॉकिंग सिस्टीम व अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था',‌‘ट्रॅफिक कमी करण्यासाठी चौथा दिवा',‌‘प्लास्टोस्कोप',‌‘स्मार्ट कुकर',‌‘स्मार्ट ड्रेनेज अँड वेस्ट मॅनेजमेंट' आदींसह 199  विविध प्रयोगांचे मॉडेल सादर करण्यात आले. प्रदर्शनात धाराशिव,लातूर व नांदेड जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्ण व मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला आहे.

 
Top