भूम (प्रतिनिधी)- भूम नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या आज शेवटच्या दिवशी दि. 17 नोव्हेंबर रोजी दोन्ही आघाडीकडून अर्ज दाखल करण्यात आले.
यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी 9 उमेदवारांनी तर 20 नगरसेवक पदासाठी 84 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. सकाळपासूनच अर्ज दाखल करण्यासाठी नगरपरिषद कार्यालयासमोर शहरातील दोन्ही आघाडीच्या वतीने मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
आलमप्रभूं शहर विकास आघाडीच्या वतीने भूम शहरातून रॅली काढत ग्रामदैवत आलमप्रभू चे दर्शन घेऊन आमदार डॉ. प्रा. तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांनी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार संयोगिता गाढवे यांच्यासह नगरसेवक यांचे उमेदवारी अर्ज शक्ती प्रदर्शन करत दाखल केले. तसेच जनशक्ती परिवर्तन विकास आघाडीच्या वतीने सर्वपक्षीय नेत्यासोबत माजी आमदार राहुल मोटे, माजी आमदार सुजितसिंह पाटील ,बाळासाहेब शिरसागर यांच्या उपस्थितीत माजी नगराध्यक्ष विजयसिंह थोरात यांनी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सत्वशीला थोरात यांच्यासह नगरसेवकांचे उमेदवारी अर्ज दाखल केले.
यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने दगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या वतीने नगरपरिषद मध्ये उमेदवार व त्यांच्यासोबत दोनच व्यक्तींना प्रवेश देण्यात येत होता. त्यामुळे दोन्हीही आघाडी सोबतचे नेते मंडळी यांना बाहेरच थांबावे लागले .त्यामुळे काही काळ पोलीस प्रशासन व नेते मंडळी यांच्यामध्ये तू तू मै मै झाल्याचे पहावयास मिळाले. सध्यातरी दोन्ही आघाडीकडून मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल करण्यात आले आहेत. मात्र दि. 21 नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी सर्व चित्र सष्ट होणार आहे. काही प्रभागांमध्ये दोन्ही आघाडीकडून इच्छुक उमेदवारांचे एका पेक्षा जास्त उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. मात्र कोणाचे अर्ज राहतात. कोणाला काढून घेण्यास सांगितले जाते. हे मात्र येणाऱ्या पुढील चार दिवसांमध्ये दिसणार आहे. त्यामधून दोन्ही आघाड्यांतील उमेदवार अर्ज काढून घेणार आहेत. त्यांच्या नाराजीला मात्र नेते मंडळीला सामोरे जावे लागणार आहे .सध्या तरी निवडणुकीचे वातावरण तापले असून नगराध्यक्ष पदासह नगरसेवक निवडणूक दुरंगी लढतीकडे जात असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
.नगरपरिषद निवडणुका लागल्या त्यावेळेसच याचा निकाल लागलेला आहे .परंडा व भूम या ठिकाणचे लोकप्रतिनिधी नगरसेवक अहोरात्र झटणारे आहेत. भूम परंड्या शहराचा मागील काळात शेकडो कोटीचा निधी आणून विकास केला. त्यामुळे नागरिक मतदार दोन्ही ठिकाणाच्या नगरपालिका आमच्या ताब्यात येतील. आमच्या नगराध्यक्षासह नगरसेवकांना निवडून देतील.
आमदार डॉ. प्रा. तानाजी सावंत
नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी
नगरपरिषद समोरील व मागील बाजूचे व्यापाऱ्यांचे दुकाने दिवसभर पूर्णपणे प्रशासनाकडून बंद ठेवण्यात आल्याने व्यापाऱ्यांचा एक दिवसाचा व्यवसाय बंद झाला त्यामुळे प्रशासनावर व्यापारी वर्गाने नाराजी व्यक्त केली.

