धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यात (एलसीडीसी) कुष्ठरोग शोध मोहीम 17 नोव्हेंबर ते डिसेंबर 2025 दरम्यान राबविण्यात येणार आहे. नागरिकांनी या मोहिमेत स्वेच्छेने तपासणी करून घ्यावी आणि कुष्ठरोगमुक्त जिल्हा निर्माण करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले.
कुष्ठरोग शोध मोहिमेच्या पूर्वतयारीसाठी जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक आज 17 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात संपन्न झाली.या बैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास,सहाय्यक संचालक ( कुष्ठरोग) डॉ.मारोती कोरे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.अभिजीत बनसोडे तसेच जिल्हास्तरीय समन्वय समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.
राज्यात कुष्ठरोगाचा प्रसार रोखण्यासाठी आणि रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नुकतेच कुष्ठरोगाला ‘नोटिफायबल डिसीज' घोषित केले आहे.यानुसार कुष्ठरोगाचे निदान झालेल्या सर्व रुग्णांची नोंद दोन आठवड्यांच्या आत संबंधित जिल्हा आरोग्य कार्यालय, सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) तसेच स्थानिक नागरी आरोग्य अधिकाऱ्यांकडे करणे सर्व डॉक्टर व आरोग्य संस्थांसाठी बंधनकारक आहे.
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांना, जिल्हाधिकाऱ्यांना आणि गावांच्या सरपंचांना पत्र लिहून ही मोहीम यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे. आपल्या जिल्ह्यातील या मोहिमेत जास्तीत जास्त रुग्णांचे निदान व्हावे आणि सर्व यंत्रणा समन्वयातून काम करून ही मोहीम प्रभावीपणे राबवावी,असे आवाहन त्यांनी केले.
आरोग्य विभागाचे मुख्य सचिव डॉ. निपुण विनायक यांनीही या अभियानाचा सखोल आढावा घेतला असून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना अभियान यशस्वी करण्यासाठी मार्गदर्शक सूचना पत्राद्वारे दिल्या आहेत.राज्यातील नागरिकांना सहकार्याचे आवाहन करताना कुष्ठरोगावरील उपचार पूर्णपणे मोफत, प्रभावी आणि सर्व सरकारी आरोग्य संस्थांमार्फत उपलब्ध आहेत,अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरीदास यांनी दिली.
कुष्ठरोगाविषयी समाजातील गैरसमज आणि भीती दूर करणे हे या मोहिमेचे महत्त्वाचे अंग आहे.यासाठी जिल्हा माहिती कार्यालय,स्थानिक स्वराज्य संस्था,स्वयंसेवी संस्था आणि समुदाय संघटनांच्या सहकार्याने ध्वनिप्रसार,रॅली,पोस्टर्स, पथनाट्य,सामाजिक माध्यमांवरील संदेश, शाळा महाविद्यालयांतील जनजागृती यांसारखे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. कुष्ठरोगाची महत्त्वाची लक्षणे : त्वचेवर बधिर किंवा संवेदनशून्य चट्टे,हातपाय सुन्न होणे किंवा बधिरपणा,त्वचेवर गाठी/उठाव,स्नायूंचा कमकुवतपणा, हातपायातील विकृती अशी कोणतीही लक्षणे आढळल्यास त्वरित जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील 1202 पथकांमार्फत एकूण 3 लाख 9 हजार 500 घरांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.नागरिकांनी मोहिमेत सहकार्य करावे आणि घराघरात येणाऱ्या पथकांकडून कुष्ठरोग तपासणी करून घ्यावी,असे आवाहन सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ.मारोती कोरे यांनी केले.
