धाराशिव (प्रतिनिधी)- वाचन संस्कृती मुळे वैचारिक प्रगल्भता वाढीस लागत असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील यांनी केले. धाराशिव येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिवच्या ग्रंथालय विभागाच्या वतीने गोल्डन रिडर्स ज्येष्ठांसाठी सुवर्ण वाचन मोहीम प्रारंभ करण्यात आली.
पुढे बोलताना नानासाहेब पाटील म्हणाले की, मोबाईलच्या युगात वाचन संस्कृती नष्ट होत चालली आहे. पूर्वी ज्यावेळी मोबाईल अस्तित्वात नव्हते किंवा त्याहुनही जुन्या पिढीचे लोक सतत वाचन करत. वृत्तपत्रे, विविध वैचारिक ग्रंथ, संस्कृती सभ्यतेवर आधारित ग्रंथ, चरीत्र ग्रंथ असा वाचनीय खजीना त्यांच्याजवळ असत. ही वाचन केलीली मंडळी वाचनातुन आलेले विचार समाजात मांडत असत. म्हणजे वाचनामुळे वक्तृत्व कौशल्य ही आत्मसात होते. म्हणूनच रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाच्या वतीने जेष्ठ नागरीकांसाठी गोल्डन रिडर्स ज्येष्ठांसाठी सुवर्ण वाचन मोहीम सुरू करण्यात येत आहे. जेणेकरून जेष्ठांचा आदर्श घेऊन भावी पिढी मध्ये वाचन संस्कृती समृद्ध होईल, असे अनमोल मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संदीप देशमुख यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. सदर प्रसंगी डॉ. टी. एल बारबोले, डॉ मंगेश भोसले, डॉ. अरविंद हंगरगेकर, यांच्या सह सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रंथालय प्रमुख डॉ मदनसिंग गोलवाल यांनी पुढाकार घेतला.
