वाशी (प्रतिनिधी)- शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सोमवार, दि. 17 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास एसटी बसचे ब्रेक अचानक फेल झाल्याने मोठा अपघात होण्याचा धोका निर्माण झाला. या अपघातात चार जण जखमी झाले असून दोन दुचाकींचे मोठे नुकसान झाले. मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी जीवितहानी टळली. कळंब आगाराची बस (एमएच 14 बीटी 1435) कळंबहून पिंपळगाव लिंगी मार्गे वाशी बसस्थानकाकडे निघाली होती. पुढे रस्ता बंद असल्याचे नागरिकांनी सांगितल्याने बसला पर्यायी मार्गाने वळवण्यात आले. गाडी उतारावर आल्यानंतर बसचे ब्रेक अचानक निकामी झाले.
धोक्याची जाणीव होताच चालक एम. पी. राऊत यांनी तत्परता दाखवत बस नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला आणि “ब्रेक फेल झाले, बाजूला व्हा!” अशी हाक मारत नागरिकांना सावध केले. रस्त्यावरील लोकांनी तात्काळ बाजूला होत जीव वाचवला, असे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. त्यांनी पुढे सांगितले, “चालकाने जर त्या क्षणी धाडसाने गाडी रोखण्याचा प्रयत्न केला नसता तर आज मोठी दुर्घटना घडली असती. अक्षरशः देव पावला असे म्हणावे लागेल.”
मात्र या दरम्यान रामकुंड (ता. भूम) येथील सोमनाथ आणि सुशीला खांडेकर यांच्या दुचाकीला बसने धडक दिली. धडकेत सुशीला खांडेकर बसच्या पुढील चाकात अडकल्या, तर सोमनाथ खांडेकर बाजूला फेकले गेले. चालकाने गाडीची दिशा न बदलता सरळ पुढे नेल्यामुळे सुशीला खांडेकर या बसखाली शरीर वाकवून झोपल्याने बचावल्या.
बस नंतर समोरच्या थोबडे यांच्या व्यापारी संकुलाजवळील दोन दुचाकींना धडक देत पायऱ्यांवर अडकून थांबली. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. अपघातात खांडेकर दांपत्य गंभीर जखमी झाले असून दसमेगाव येथील शारदाबाई शिंदे व त्यांचे पती किरकोळ जखमी झाले. सर्वांना वाशी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. खांडेकर दांपत्याला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. प्रत्यक्षदर्शींनी एकमुखाने चालकाच्या धाडसाची दाद दिली असून, “त्यांनी दाखवलेल्या शांतपणामुळे आणि वेगवान निर्णयामुळे अनेकांचे जीव वाचले,” असे मनोगत व्यक्त केले.

