धाराशिव (प्रतिनिधी)- सन 2025-26 या कालावधीतील ऊसतोड हंगाम सुरू झाल्यानंतर धाराशिव जिल्ह्यात ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉली, ट्रक, ट्रेलर व बैलगाड्या राष्ट्रीय महामार्गासह विविध प्रमुख मार्गांवरून संथ गतीने प्रवास करतात.यातून वाहतुकीला अडथळा निर्माण होतो तसेच अशा वाहनांच्या मागील बाजूस रिफ्लेक्टर नसल्यामुळे विशेषतः रात्रीच्या वेळी अपघात होण्याची शक्यता वाढते.

यासाठी,ऊस वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांच्या पुढील व मागील बाजूस रिफ्लेक्टीव्ह टेप लावणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांना आवाहन करण्यात येते की,आपल्या कारखान्यास ऊस वाहतूक करणारी ट्रक, ट्रॅक्टर, ट्रेलर व बैलगाड्या यावर रिफ्लेक्टर बसविल्याची खात्री करूनच ऊस वाहतूकीला परवानगी द्यावी. तसेच ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या संख्येनुसार पुरेसे कापडी रिफ्लेक्टीव्ह बोर्ड छापून संबंधित वाहनधारकांना वितरित करावेत व त्यांचा वापर करण्यास प्रोत्साहित करावे. यामुळे अपघाताचे प्रमाण कमी होऊन रस्ता सुरक्षा उद्दिष्ट साध्य होईल.

दरम्यान,ऊस वाहतूक करणाऱ्या वाहन चालक व मालकांना आवाहन करण्यात येते की वाहनाच्या क्षमतेपेक्षा अधिक ऊसाची वाहतूक करू नये,तसेच रेट्रो रिफ्लेक्टीव्ह टेप बसविल्याशिवाय रस्त्यावर वाहतूक करू नये.जर अशी वाहने रस्त्यावर आढळून आली तर त्यांच्यावर मोटार वाहन कायद्यानुसार आवश्यक त्या कारवाई करण्यात येईल,याची नोंद घ्यावी.असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी,धाराशिव यांनी सांगितले आहे.


 
Top