धाराशिव (प्रतिनिधी)- पुणे येथे आयोजित सुश्रुती 2025 इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये धाराशिव येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाने उत्तुंग कामगिरी करत बेस्ट इन्स्टिट्यूशनल अवॉर्ड पटकावला आहे.
21 ते 23 नोव्हेंबर रोजी निमा ओबीजीवाय सेंट्रल यांच्या वतीने डॉ. डी.वाय.पाटील कॉलेज,पुणे येथे ही भव्य परिषद पार पडली. देशभरातील 27 संस्थांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. त्यामध्ये धाराशिवच्या शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाने तिसरा क्रमांक पटकावत हा मानाचा बहुमान मिळवला. हे यश महाविद्यालयाच्या अधिष्ठाता प्रा. डॉ. वीणा पाटील यांच्या नेतृत्वात तसेच स्त्रीरोग व प्रसूति तंत्र विभागाचे डॉ. अगावणे, डॉ. बालाजी लोमटे आणि डॉ.श्वेता पोतदार यांच्या मार्गदर्शनात साध्य झाले.
प्रसूति तंत्र व स्त्रीरोग विभागातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांचे सहकार्यही या यशात मोलाचे ठरले.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ आणि स्मिता जाधव उपस्थित होत्या.त्यांनी विजेत्या टीमला ट्रॉफी आणि सन्मानपत्र प्रदान करून महाविद्यालयाच्या कामगिरीचे कौतुक केले. यावेळी डी.वाय.पाटील कॉलेजचे प्राचार्य प्रशांत खाडे तसेच डॉ.पी.डी.पाटील, डॉ.शांतीलाल शर्मा, डॉ. प्रदीप मुसळे, डॉ.हेर्लेकर, डॉ. तावरे आणि डॉ. सुर्यकर उपस्थित होते.