धाराशिव (प्रतिनिधी)-  छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्याचे तहसीलदार विद्याचरण कडावकर यांची धाराशिव जिल्ह्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

कडावकर यांची ही तहसीलदार पदावरून उपजिल्हाधिकारी पदावर झालेली पदोन्नती असून, त्यांची पहिलीच नियुक्ती धाराशिव जिल्ह्यात झाली आहे. विद्याचरण कडावकर यांनी यापूर्वी परभणी आणि जालना जिल्ह्यातील अंबड येथे तहसीलदार म्हणून यशस्वीपणे कार्य केले आहे. त्यानंतर त्यांची बदली तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या दिल्ली येथील कार्यालयात झाली होती. तेथे त्यांनी काही काळ काम पाहिल्यानंतर त्यांची छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्याचे तहसीलदार म्हणून नेमणूक करण्यात आली होती.

सेवाज्येष्ठतेनुसार त्यांची उपजिल्हाधिकारी पदावर पदोन्नती करण्यात आली असून, शासनाने त्यांना धाराशिव येथे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, धाराशिवच्या निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांची अलीकडेच परभणी जिल्ह्यात बदली करण्यात आली होती. त्यांच्या जागी शासनाने पूर्वी उदय किसवे यांची नियुक्ती केली होती. उदय किसवे हे वादग्रस्त अधिकारी असल्यामुळे त्या संदर्भात माध्यमाने आवाज उठवल्यानंतर त्यांची बदली रद्द करण्यात आली आहे. महसूल आणि वन विभागाने दिनांक 11 नोव्हेंबर रोजी नवीन शासननिर्णय काढत उदय किसवे यांच्या नियुक्तीच्या आदेशात अंशतः बदल करून विद्याचरण कडावकर यांची नियुक्ती केली. विद्याचरण कडावकर हे येत्या दोन दिवसात पदभार स्वीकारतील असा अंदाज आहे.


 
Top