वाशी (प्रतिनिधी)- टँकर वाहतुकीचे थकीत असलेले 43 लाख 41 हजार रूपये मागितल्याचा राग मनात धरून एका व्यक्तीला स्कॉर्पिओ गाडी आडवी लावून तुझ्या डोक्यात गोळी घालतो अशी धमकी देत अपहरण केल्याची धक्कादायक घटना वाशी तालुक्यातील गिरवली पाटी येथे घडली आहे. या प्रकरणी वाशी पोलिस ठाण्यात श्रीरामपूर येथील एका आरोपीविरोधात अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी ज्ञानेश्वर सोपान गिते (वय 44, रा. आंद्रुड, ता. भूम, जि. धाराशिव) यांचे जिल्हाधिकारी कार्यालयामधील टँकर वाहतुकीचे 43 लाख 41 हजार 537 रूपये आरोपी यादवेंद्र दिलीप शर्मा (रा. मार्केट यार्ड, श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) याच्याकडे बाकी होते. दिनांक 10 नोव्हेंबर रोजी रात्री 9.35 च्या सुमारास गिते यांनी आरोपी शर्मा याला एनएच 52 रोडवर गिरवली पाटी येथे पैशाची मागणी केली. याचा राग मनात धरून आरोपी शर्माने फिर्यादी गिते यांना स्कॉर्पिओ गाडी आडवी लावली. त्यानंतर तुझ्या डोक्यात गोळी घालतो अशी धमकी देत गिते यांना जबरदस्तीने गाडीत बसवून धोकादायकरित्या पळवून नेले. या घटने प्रकरणी ज्ञानेश्वर गिते यांनी 11 नोव्हेंबर रोजी वाशी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी यादवेंद्र शर्मा यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 140 (3) आणि 351 (2) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास वाशी पोलिस करत आहेत.