धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला मोठा धक्का बसला आहे. आक्रमक शिवसैनिक म्हणून ओळख असलेल्या सगुनाताई आचार्य यांच्यासह शहरातील शेकडो महिलांनी भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे. हा कार्यक्रम धाराशिव येथील भाजप कार्यालयात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
सदरील पक्ष प्रवेश हा भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, जिल्हा प्रवक्ते ॲड.नितीन भोसले, भाजपा शहराध्यक्ष अमित शिंदे, भाजपा महिला जिल्हाध्यक्ष प्रितीताई कदम,भाजपा महिला माजी जिल्हाध्यक्ष नंदाताई पुनगुडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश पार पडला.
हा पक्षप्रवेश युवा नेते कुणाल निंबाळकर आणि बालाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला असून यावेळी शहरातील असंख्य महिलांनी भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी प्रवेश करणाऱ्या महिलांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. पक्षप्रवेश वेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मनिषाताई केंद्रे, वंदनाताई डोके, तसेच पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सगुनाताई आचार्य यांच्या सोबत प्रवेश करणाऱ्या प्रमुख महिलांमध्ये मनिषाताई गोवर्धन, वंदना तीते, लता आगळे, स्वाती कुलकर्णी, अलका महाजन, अनुताई मगर, चंद्रकला घोडके, अमृता पवार, मंजिरी चिंचपुरकर, आरती कुलकर्णी आदींचा समावेश आहे.
या प्रसंगी आमदार राणाजगजीतसिंह पाटील म्हणाले की, “महिलांना सक्षम करण्याचे धोरण भारतीय जनता पक्षाचे असून पक्षात सर्वसामान्य महिलेलाही न्याय आणि सन्मान मिळतो. महिलांच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देत भाजपा त्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवते. त्यामुळे भाजपा हा जनतेचा, विशेषतः महिलांचा, खरा पक्ष आहे.” कार्यक्रमात बोलताना सगुणाताई आचार्य म्हणाल्या की, “आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात महिलांचे मोठे संघटन उभे राहात आहे. जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष अर्चनाताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला संघटन भाजपा मजबूत करण्यासाठी तळागाळात काम करत आहे.”
या प्रवेश सोहळ्यात युवा नेते कुणाल निंबाळकर आणि बालाजी जाधव यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “महिलांच्या सक्रीय सहभागामुळे धाराशिव जिल्ह्यात भाजप आणखी बळकट होईल. पक्षाच्या विचारसरणीशी जोडलेली प्रत्येक महिला ही नव्या परिवर्तनाची दिशा ठरेल.” भाजपच्या ध्येयधोरणावर विश्वास ठेवून झालेला हा प्रवेश सध्या धाराशिवच्या राजकारणात मोठी चर्चा निर्माण करणारा ठरत आहे.
