भूम (प्रतिनिधी)-  येथील नगर परिषद निवडणुकीत यंदा प्रचाराची दिशा बदलणारा अनोखा ट्रेंड पाहायला मिळत आहे. एक नगराध्यक्ष व 10 प्रभागातून 20 नगरसेवक निवडून देण्यासाठी विविध राजकीय पथकाकडून जोरदार मोहीम सुरू असून, यंदा या मोहिमेतील सर्वात आकर्षक ठरले आहेत ते परंपरेचे दूत वासुदेव. यावेळी वासुदेव प्रभागनिहाय गल्लो गल्ली फिरत डोअर-टू-डोअर पद्धतीने मतदारांशी थेट संवाद साधत आहेत. 

पारंपरिक पोशाख, डोक्यावरची रंगीत पगडी, हातातील झांज-चिपळ्यांचा नाद आणि खास शैलीत मांडलेली जंत्री यामुळे वासुदेवांची प्रत्येक भेट मतदारांसाठी एक खास अनुभव बनत आहे. वासुदेवांच्या या उपस्थितीमुळे प्रचाराला सांस्कृतिक रंगत मिळत असून अलमप्रभू आघाडीचा संदेश अधिक प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचत आहे. काही ठिकाणी वासुदेवांची जंत्री ऐकण्यासाठी घराबाहेर आलेल्या नागरिकांनी उमेदवारांविषयी चौकशी केली. आपली मते व्यक्त केली आणि निवडणूक वातावरणात उत्साहाची नवी लाट जाणवली.

दरम्यान, यंदा डिजिटल प्रचाराला प्रचंड वेग आला असला तरी स्थानिक परंपरा, लोकसंस्कृती आणि प्रत्यक्ष मतदार संवाद हे घटक अजूनही प्रभावी असल्याचे चित्र वासुदेवांच्या कामगिरीतून स्पष्ट होत आहे. अलमप्रभू शहरविकास आघाडीने सोशल मीडिया जाहिरातींसोबतच या पारंपरिक माध्यमाचा वापर केल्याने तरुण, मध्यमवयीन आणि वयोवृद्ध अशा सर्वच मतदारांपर्यंत पोहोचण्याची संधी निर्माण झाली आहे. शहरात या उपक्रमाची जोरदार चर्चा असून “परंपरेला आधुनिकतेची जोड” हा अलमप्रभू आघाडीचा प्रयोग सर्वत्र कौतुकाचा विषय ठरत आहे. निवडणुकीच्या तोंडावर वासुदेवांच्या सांस्कृतिक जंत्रीने केवळ मतदारांचे लक्ष वेधले नाही, तर निवडणूक प्रचाराच्या पद्धतींमध्ये नवीन दिशा देण्याचे काम केले आहे.

 
Top