भूम (प्रतिनिधी)-  नगर परिषदेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज परत घेण्याच्या अंतिम दिवस खऱ्या अर्थाने राजकीय नाट्यमयतेने भरलेला ठरला. नगराध्यक्ष पदासाठी एकूण 9 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मात्र, कागदपत्र छाननी आणि अर्ज परत घेण्याच्या प्रक्रियेनंतर एकूण 5 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले.

एक अर्ज हा डमी असल्याने तोही बाद करण्यात आला. परिणामी, आता केवळ 3 उमेदवार नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत अधिकृतपणे रिंगणात राहिले असून तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. नगराध्यक्ष पदासाठी मात्र खरी लढत ही आलमप्रभू शहर विकास आघाडीच्या संयोगिता ताई गाढवे व जनशक्ती नगर विकास आघाडीच्या सत्वशीला ताई थोरात यांच्यात होणार आहे. परंतु यात तिसरा अर्ज जो राहिला आहे तो प्रगती ताई गाढवे यांचा असल्याने ही एक राजकीय खेळी खेळण्यासाठी ठेवला असल्याचे राजकीय जानकर यांच्यातून बोलले जाऊ लागले आहे. परंतु याचा खरा फायदा होईल की नाही हे निवडणूक निकाला नंतरच स्पष्ट होणार आहे. नगरसेवक पदाच्या उमेदवारीत देखील मोठ्या चढउतारांनी वातावरण रंगतदार झाले. सुरुवातीला 20 प्रभागांसाठी तब्बल 84 अर्ज दाखल झाले होते. दुसऱ्या दिवशीच्या छाननीत 3 अर्ज अपात्र ठरविण्यात आले आणि 81 अर्ज वैध ठरले. यात ही 3 अर्ज डबल उमेदवारांनी भरले होते म्हणून ते ही बाद झाल्याने ही 78 अर्ज राहिले होते. मात्र आज माघारीच्या अंतिम टप्प्यात 36 उमेदवारांनी माघार घेतल्याने अंतिम आकडा 42 स्पर्धकांवर येऊन थांबला आहे. यात 20 उमेदवार हे आलमप्रभू शहर विकास आघाडीच्या वतीने नगरसेवक पदासाठी तर 20 उमेदवार ही जनशक्ती नगर विकास आघाडी नगरसेवक पदासाठी निवडणूक रिंगणात राहणार आहेत. तर 2 उमेदवार हे अपक्ष म्हणून नगर सेवक पदासाठी उभे राहणार आहेत. म्हणजेच, प्रभागनिहाय स्पर्धा आता अधिक तीव्र, सुस्पष्ट आणि थेट झाली आहे. या माघारीमुळे अनेक प्रभागांतील समीकरणे अक्षरशः एकाच दिवसात पालटली आहेत. काही प्रभागात सरळ सामना तर काही ठिकाणी तिरंगी- लढतीचे संकेत मिळत आहेत. दरम्यान अर्ज माघारी घेण्यासाठी लावलेल्या उमेदवारांची नाराजी हे ही या निवडणुकीत एक डोके दुखी होण्याचे संकेत मिळत आहेत. यामुळे नेते मंडळी यांना आता पहिल्यांदा खुश करून पुढील रणनीती ठरवावी लागणार आहे. दरम्यान, आलमप्रभू शहर विकास आघाडी व जनशक्ती नगर विकास आघाडीच्या उमेदवार यांनी अर्ज माघारीनंतर निर्माण झालेल्या नव्या समीकरणांचे दोनही आघाडीच्या वतीने बारकाईने विश्लेषण सुरू केले असून, रणनीतीत त्वरित फेरबदल होताना दिसत आहेत. 

 
Top