कळंब (प्रतिनिधी)- कळंब नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीच्या उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदाचे 9 पैकी 3 तिघांनी आपले अर्ज परत घेतले. तर सदस्य पदाचे 94 पैकी 27 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी खरी लढत महायुतीच्या सुनंदा कापसे, महाविकास आघाडीच्या रेश्मा मुंडदा, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या मिनाक्षी भवर याप्रमाणे तिरंगी लढत होत आहे.
त्यामुळे होणाऱ्या आतितटीच्या लढतीमध्ये अपक्षांसह केवळ आता सहाच उमेदवार नगराध्यक्षपदाच्या निवडणूक रिंगणामध्ये उभा आहेत. तर प्रभाग 2 ब मधून 4, प्रभाग 3 ब मधुन 4 , प्रभाग 4 अ मधून 1 ,प्रभाग 4 ब मधून 1, प्रभाग 5 अ मधून 1, प्रभाग 5 मधून ब 2, प्रभाग 6 ब मधून 1, प्रभाग 7 ब मधून 3, प्रभाग 8 अ मधून 1, प्रभाग 8 ब मधून 5,प्रभाग 9 ब मधून 1, प्रभाग 10 अ मधून 1, प्रभाग 10 ब मधून 2 अशा एकूण 27 सदस्य पदा करिता भरलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज शेवटच्या दिवशी मागे घेतले. कळंब नगर परिषद निवडणुकीचा आखाडा आता रंगात आला आहे. अध्यक्षपद जनतेतून निवडले जाणार आहे तर 10 प्रभागातून द्विसदस्यीय पद्धतीने 20 सदस्य पदांच्या निवडीसाठी ही निवडणूक होत आहे. निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी शुक्रवारी (दि.21) अर्ज मागे घेण्याची अंतीम मुदत दिवशी अर्ज मागे घेतल्याने तिरंगी लढाईचे चित्र स्पष्ट झाले आहे.
2 डिसेंबर रोजी मतदान तर 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होवून निकाल जाहीर करण्यात येणार आहे. या नगर परिषद क्षेत्रातील 20 हजार 958 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यात 10713 पुरुष, 10245 महिला मतदार आहेत. मतदानासाठी शहरात 24 ठिकानी मतदान केंद्रे निश्चित केली आहेत.