धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव नगरपालिका निवडणुकीसाठी 280 इच्छुक उमेदवारांनी न. प. निवडणुकीसाठी बेबाकी प्रमाणपत्र घेतले आहे. परंतु दुसऱ्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नव्हता. तर तिसऱ्या दिवशी दोन उमेदवारांनी आपले तीन अर्ज दाखल केले आहेत.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने सय्यद खलील सैफ यांनी प्रभाग क्रमांक 18 साठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर पृथ्वीराज कल्याण देडे यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व शिवसेना उबाठा गट या पक्षाचे नावे टाकून दोन उमेदवारी प्रभाग क्रमांक 1 मध्ये दाखल केले आहेत.
नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास 10 नोव्हेंबरपासून प्रारंभ झाला आहे. असे असतानाही इच्छुक उमेदवार मात्र नगर परिषदेने उमेदवारी अर्जासोबत जे 26 कागदपत्र लागतात ते कागदपत्र जमविण्यात व्यस्त असल्याचे समजते. यावर्षीपासून ऑनलाईन उमेदवारी अर्ज भरणे सुरू असल्यामुळे व उमेदवारांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने गोंधळाचा विषय झाला आहे. धाराशिव शहरात 41 नगरसेवकांसह 1 नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होत आहे. शहरात 94 हजार 14 इतकी मतदार संख्या आहे. 20 प्रभागापैकी 19 प्रभागामध्ये तीन सदस्यांना निवडून द्यायचे आहे.