धाराशिव (प्रतिनिधी)-केंद्रीय भूजल बोर्ड, राज्य एकक कार्यालय पुणे यांच्या वतीने 27 नोव्हेंबर रोजी धाराशिव येथील तेर रोडवरील कृषी महाविद्यालयात भूजल व्यवस्थापन आणि कृत्रिम पुनर्भरण या विषयावर एकदिवसीय टियर- प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे उदघाटन धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ति किरण एस. पुजार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विशेष मान्यवर अतिथी म्हणून कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब बडगिरे, मराठवाडा विद्यापीठ उपपरिसराचे भूमी आणि जल व्यवस्थापन विभागप्रमुख प्रा. नितीन पाटील तर अध्यक्षस्थानी भूजल बोर्डाचे क्षेत्रीय निदेशकडॉ. उमेश बालपांडे हे उपस्थित होते.

या प्रसंगी कृत्रिम पुनर्भरण पद्धतींवर एक पुस्तिका प्रकाशित करण्यात आली. तांत्रिक सत्रांमध्ये केंद्रीय भूजल बोर्ड, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा आणि कृषी महाविद्यालयातील प्राध्यापकांनी केंद्रीय मार्गदर्शक तत्त्वांनुसार सर्व महत्त्वाच्या भूजल विषयांचा आढावा घेतला. राज्य शासन कर्मचारी, कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी, स्वयंसहायता गटातील महिला, उमेदच्या सदस्य, शेतकरी यांनी सक्रिय सहभाग घेतला. सर्व सहभागींनी केंद्रीय भूजल बोर्डाच्या भूजल व्यवस्थापन संदर्भात जलसाक्षरता उपक्रमांबाबतच्या प्रयत्नांचे कौतुक केले. एकूण 134 सहभागी या कार्यशाळेत उपस्थित होते.


 
Top