धाराशिव (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांना आमदार राणाजगजतसिंह पाटील यांनी खुले पत्र पाठवले असून, याच्या माध्यमातून तुळजापूर ड्रग्स प्रकरणात समोरासमोर चर्चेचे आव्हान दिले आहे. दरम्यान, भाजपमध्ये घेण्यात आलेल्या तुळजापूरचा नेता सुरूवातीला शरद पवार गटातच होता. असा दावा त्यांनी पत्रात केला आहे.
यामध्ये आमदार पाटील म्हणाले, अजित पवार आणि सुनेत्रा आत्या ज्याप्रमाणे माझे नातेवाईक आहेत, त्याप्रमाणेच आपण सुध्दा माझ्या जवळच्या नातेवाईक आणि माझ्या थोरल्या बहीण आहात आणि त्याचा मला मनापासून आदर आणि अभिमान आहे. काही चुकीच्या आणि अपुऱ्या माहितीद्वारे किंवा कदाचित राजकीय अपहिहार्यतेतून आपण व्यक्तिशः माझ्याबद्दल जाहीरपणे सलग वक्तव्ये करत आहात. तुळजापूर येथील माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर यांनी माझ्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. हा प्रवेश करायच्या क्षणापर्यंत ते तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तुळजापूर शहरातील प्रमुख नेते होते. हे कदाचित आपल्याला माहित नसेल. त्यांच्यावर ड्रग्जप्रकरणी आरोप झाल्यानंतर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून काही काढून टाकण्यात आले नव्हते. असे पत्रात म्हटले आहे. आपण स्वतः एवढ्या जबाबदार व्यक्ती असतानाही आपल्याकडून जे काही बोललं गेलं ते तुळजाभवानी मातेच्या तीर्थक्षेत्र तुळजापूरची जाणीवपूर्वक बदनामी करण्याच्या षडयंत्राला नकळत का असेना बळ देणारं आहे. तुळजापूरच्या ड्रग्ज प्रकरणाबाबत आपण सलग दो नवेळा जे वक्तव्य केले आहेत, त्याची वस्तुनिष्ठ माहिती आपण जाणून घ्यायला हवी होती. नाहीतर ही वक्तव्ये राजकारणाने प्रेरित मीडिया ट्रायल करण्यासाठी जाणीवपूर्वक केली जात असल्याचं स्पष्ट होतंय, असे आमदार पाटील यांनी म्हटले आहे.