धाराशिव (प्रतिनिधी)-  स्थानिक गुन्हा शाखेचे पथक धाराशिव जिल्ह्यातील झालेल्या गुन्हा संदर्भात माहिती घेत पेट्रोलिंग करीत असताना त्यांनी गुप्त बातमीद्वारे काढलेली माहिती तांत्रिक विश्लेषण करून पाहिली असता जिल्ह्यातील जनावरे चोरणारी आंतरजिल्हा टोळीची माहिती मिळाली. या माहितीनुसार स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने सातारा जिल्ह्यातील फलटन येथून 7 लाख 30 हजार रूपयांच्या जनावरांसह आरोपीस जेरबंद केले. 

याबाबत अधिक माहिती अशी की, वाशी पोलिस स्टेशन येथे  जनावरे चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. हा गुन्हा आरोपी रविंद्र उर्फ बुठा ठकसेन रायते, रा. फलटन याने त्याचे अन्य साथीदारासह केला असल्याचे निष्पन्न झाले. नमुद आरोपीची माहिती काढुन शोध घेत असताना आरोपी रविंद्र उर्फ बुठा ठकसेन रायते, वय 33 वर्षे, रा. कणसे वस्ती, गुणवरे ता. फलटन जि. सातारा हा मिळुन आल्याने त्याचेकडे नमुद गुन्ह्याचे अनुषंगाने चौकशी केली असता त्याने गुन्ह्या संदर्भात माहिती दिली नाही. त्यानंतर स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने रायते यास अधिक विश्वासत घेवून चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा त्याचे इतर साथीदार नामे ऋषीकेश बिंटु जगताप, रा. गोखली ता. फलटन जि. सातारा व राहुल सुभाष सपकाळ, रा. सोनगाव ता. बारामती जि. पुणे असे तिघांनी मिळून केला असल्याचे सांगीतले.  त्यावरुन पथकाने इतर दोन आरोपीचा शोध घेवून त्यांना ताब्यात घेतले. गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या 03 म्हशी व गुन्ह्यात वापरलेले वाहन पिकअप हे ताब्यात घेवून 03 म्हशी व पिकअप वाहन असे एकुण 7 लाख 30 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

सदरील कामगिरी पोलिस अधीक्षक रितु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली विनोद इज्जपवार पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा धाराशिव, सपोनि सचिन खटके, पोलीस हावलदार विनोद जानराव, नितीन जाधवर, पोलीस नाईक बबन जाधवर, चालक पोलीस हावलदार प्रशांत किवंडे यांचे पथकाने केली आहे.


 
Top