धाराशिव (प्रतिनिधी)- संपूर्ण महाराष्ट्रभर 5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर हा आठवडा पक्षी सप्ताह म्हणून साजरा केला जातो. 12 नोव्हेंबर हा पद्मविभूषण प्रख्यात पक्षीशास्त्रज्ञ डॉ.सलीम अली यांचा जन्मदिवस. पक्ष्यांच्या अभ्यासासाठी आणि संवर्धनासाठी त्यांना ओळखले जाते. त्यांच्या कार्यामुळेच भारतात पक्षी निरीक्षणाची परंपरा सुरू झाली, ज्यामुळे त्यांना भारतातील पक्षी निरीक्षकांचा 'आद्यगुरू' मानतात. त्यांच्या योगदानामुळेच त्यांना “बर्डमॅन ऑफ इंडिया“ म्हणूनही ओळखले जाते. त्यांच्या जयंतीच्या व पक्षी सप्ताहाच्या निमित्ताने धाराशिव येथील गुरुवर्य के.टी.पाटील फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये पक्षांबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी 'सुरेख हे पक्षी निसर्गरक्षी' या पक्षी संवर्धनावरील विषयाचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमात मानद वन्यजीव रक्षक, पक्षी अभ्यासक प्रा.डॉ.मनोज डोलारे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना उत्पत्तीपासून पक्ष्यांविषयी शास्त्रशुध्द माहिती देवून पक्षी संवर्धनाचे महत्त्व सांगितले. त्यांनी पक्षी हा मानव आणि पर्यावरणातील महत्वाचा घटक कसा आहे हे पटवून देताना विद्यार्थ्यांना स्थानिक व परदेशी पक्षांची माहिती पी.पी.टी. व दृकश्राव्य माध्यमातून दिली. यात त्यांनी पक्षांचा अधिवास, विणीचा हंगाम, स्थलांतरित, खाद्यजीवन, पक्षांतील बारकावे, निरीक्षणे, पक्ष्यांमधील गमतीजमती, आकार, रंग, अधिवास, घरट्यांचे वैविध्य विशद करताना पक्षांचा मानव जातीला आणि त्यातल्या त्यात प्रामुख्याने शेतीला असणारा उपयोग मुलांना पटवून दिला.
यात त्यांनी प्रामुख्याने स्थानिक पक्षी सुगरण, कोतवाल, खाटिक, कीर पोपट, वेडा राघू, मोर, बगळे, चिमणी, कावळा, होला, धीवर, शिंपी, पाणकावळे, घार, सर्पगरुड प इ. तसेच स्थलांतरित विदेशी असे रोहित, चक्रवाक, पट्टकादंब, मराल, तलवार, जांभळी पाणकोंबडी, चित्रबलाक, मुग्धबलाक, धोबी, तुतवार पक्षी इ. अशा जवळपास 100 पक्षांविषयी माहिती सांगितली. मार्गदर्शनाच्या शेवटी विद्यार्थ्यांच्या अनेक शंकांचे, मनातील प्रश्नांचे निरसन करून येणाऱ्या उन्हाळ्यात पक्षांच्या अन्न पाण्याची सोय करा असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ.सलीम अली यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुरुवर्य के.टी.पाटील फाउंडेशन प्रमुख प्रा.विनोद आंबेवाडीकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयमाला शिंदे तर आभार पर्यवेक्षक राजेंद्र जाधव यांनी मानले. यावेळी शिक्षक व विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
