धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील साखर कारखानदार तसेच गुळ पावडर कारखानदार यांनी चालू वर्षातील एफआरपी जाहीर न करताच ऊस गाळप चालू केले आहे. त्यामुळे उसाला 3500 रूपये पहिली उचल मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांच्या नेतृत्त्वात ढोकी येथे मुख्य चौकात शुक्रवारी दि.21 रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. जर लवकरात लवकर दर जाहीर न केल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष इंगळे यांनी यावेळी दिला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने यापूर्वीही जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना 5 ऑक्टोंबर व 11नोव्हेंबर रोजी निवेदन देवून कारखान्यांना एफआरपी जाहीर करण्याची मागणी केली होती. तसेच रास्तारोको आंदोलन करण्याबाबतही कळविले होते.  धाराशिव जिल्ह्यातील साखर कारखानदार आणि गुळ पावडर कारखानदार यांनी सर्व नियम धाब्यावर बसवून बेकायदेशीर गाळप करून ऊस उत्पादक शेतकन्यांची चेष्टा केली आहे. या अगोदर वेळोवेळी प्रशासनाला लेखी निवेदन देऊन सुद्धा प्रशासनाने सुद्धा कोणती दखल घेतलेली नाही चालू हंगामातील पहिली उचल 3500 मिळावी म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ढोकी येथे मुख्य चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

त्याशिवाय वेळीच प्रशासनाने दखल घेतली नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी. साखर सम्राटांच्या बगलबच्च्यांनी ऊसदर न ठरवता गाळप चालू करून शेतकऱ्यांच्या अन्नात माती घातली आहे. त्यास संपूर्ण प्रशासन सुद्धा जबाबदार आहे. जिल्ह्यातील काही कारखानदारांनी साखर गाळप परवाना न घेता ऊस तोड सुरू केली आहे. काटामारी, रिकव्हरी चोरी, एफआरपीचे तुकडे करून दर ठरवणे ही खूली लुट खुलेआम सुरू आहे. आणि प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेऊन या साखर सम्राटांना पाठिशी घालत आहे.

परंतु यापुढे स्वाभिमानी शेतकरी संघटना कोणाचेही लाड खपवून घेणार नाही त्यामुळे वेळीच उसाचा योग्य दर जाहीर करून शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवावी अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना यापेक्षाही तीव्र आंदोलन करणार असल्याचेही जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांनी म्हटले आहे. या आंदोलनात संघटनेचे धाराशिव जिल्हा संपर्कप्रमुख शहाजी सोमवंशी, धनाजी पेंदे, विष्णूदास डाळे, सचिन ठेले यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 
Top