धाराशिव (प्रतिनिधी)-  वीजग्राहकांच्या विविध तक्रारींचे त्वरीत व अधिक सुयोग्य पद्धतीने निराकरण करण्यासाठी मंडळ कार्यालयांतर्गत स्वतंत्र 'ग्राहक तक्रार निवारण कक्ष' स्थापन करण्यात आला आहे. माननीय वीज नियामक आयोगाच्या निर्देक्षानुसार मंडळ स्तरावर सुरू करण्यात आलेल्या या कक्षाचे औपचारिक उद्घाटन नुकतेच अधीक्षक अभियंता संजय आडे यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी अधीक्षक अभियंता संजय आडे म्हणाले की, स्वतंत्र पध्दतीने कार्यरत राहणाऱ्या या तक्रार निवारण कक्षामार्फत ग्राहकांच्या तक्रारी अधिक गतिमान पद्धतीने निकालात काढणे शक्य होणार आहे.मा. वीज नियामक आयोगाने या करिता स्वतंत्र सदस्याची नेमणूक केली असून त्यांच्या मार्फत तक्रार निवारणाची कार्यपद्धत सोपी आणि पारदर्शक होण्यास मदत होणार आहे.

याप्रसंगी महावितरणच्या धाराशिव मंडळाच्या प्रशासकीय कार्यकारी अभियंता निलांबरी कुलकर्णी, महाराष्ट्र वीज नियामक आयोगा मार्फत नियुक्त सदस्या मेधा कुलकर्णी, ग्राहक पंचायत महाराष्ट्र, जिल्हा धाराशिवचे जिल्हा अध्यक्ष शरद वडगावकर, सचिव सचिन कवडे, जिल्हा संघटक रवी पिसे यांची उपस्थित होती. नवीन स्वतंत्र तक्रार निवारण कक्ष स्थापन झाल्यामुळे ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण वेगाने आणि कार्यक्षमतेने होऊ शकेल. अशी अपेक्षा उपस्थित वीजग्राहक प्रतिनिधी व ग्राहकांनी व्यक्त केली. धाराशिव जिल्ह्यामधील सर्व ग्राहकांना या सोयीचा लाभ घेण्याचे आवाहन अधीक्षक अभियंता संजय आडे यांनी केले आहे.

 
Top